
MSEDCL Workers Strike : खाजगी करणा विरोधात पानशेत येथे वीज कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन
वेल्हे,(पुणे ) : खाजगी करणा विरोधात राज्य वीज कर्मचारी,अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या वतीने पानशेत येथे निषेध आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती संघर्ष समितीचे पुणे विभागाचे उपसचिव विश्वास साळुंखे यांनी दिली. पानशेत व वरसगाव येथील वीज निर्मिती केंद्रासह विविध वीज विभागातील कर्मचारी अधिकारी अभियंते सहभागी झाले होते. यावेळी साळुंखे म्हणाले, काही उद्योजकांनी वीज पुरवठ्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे मागणी केली आहे.
वीज निर्मिती, वितरण व पारेषण अशा तिन्ही विभागाच्या खाजगीकरणाला वीज विभागाच्या ३० संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. १२ डिसेंबर पासून दररोज आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने दखल न घेतल्यास १८ डिसेंबर रोजी बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. पानशेत येथील वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर खाजगी करण्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. विश्वास साळुंखेसह सुनील सोनवलकर, सचिन आवडाळ, कौस्तुभ निकम ,रवी तोरडमल, भगवान कदम, सागर कांबळे, युवराज सपकाळ, संतोष कांबळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी संघर्ष समितीचे पानशेत विभाग सचिव विश्वास सोनवलकर म्हणाले, वीज निर्मिती प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली महानिर्मितीकडून काम काढून घेऊन खासगी भांडवलदारांना हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सरकारने छुप्या पद्धतीने सुरू केला आहे. खासगी भांडवलदाराला प्रकल्प दिल्यास शेतकऱ्यांसह जनतेचे आर्थिक शोषण होणार आहे.