‘प्राचार्य हटाव’साठी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

तळेगाव दाभाडे - इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय बाळसराफ यांच्याविरोधात शहर परिसरातील पालक, आजी-माजी विद्यार्थी व नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. या वेळी संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी प्राचार्यांना बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले.

तळेगाव दाभाडे - इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय बाळसराफ यांच्याविरोधात शहर परिसरातील पालक, आजी-माजी विद्यार्थी व नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. या वेळी संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी प्राचार्यांना बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले.

प्राचार्य बाळसराफ यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. रजेच्या कालावधीमध्ये खंडणीची रक्कम वसूल करणाऱ्यांना महाविद्यालयात बोलावून कार्यालयीन जागेचा गैरवापर केल्याप्रकरणी संस्थेने त्यांना नोटीस दिली असून, खुलासा मागितला आहे. या पार्श्वभूमीवरच आक्रमक भूमिका घेत आजी, माजी विद्यार्थ्यांनी ‘प्राचार्य हटाव, कॉलेज बचाव’च्या घोषणा देत महाविद्यालयावर निषेध मोर्चा काढला. अनिकेत जाधव, संतोष निंबळे, सिद्धार्थ दाभाडे या माजी विद्यार्थ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, सुनील काशीद, सुनील पवार, भगवान बोत्रे, बाळकृष्ण धामणकर, गोरख काकडे यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. ‘प्राचार्य चलेजाव’, ‘प्राचार्य हटाव, कॉलेज बचाव’ आदी घोषणा देण्यात आल्या. संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  ‘‘संस्थेकडे प्राचार्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांना बडतर्फ करण्यात येईल,’’ असे आश्वासन काकडे यांनी या वेळी दिले. ‘‘येत्या शुक्रवारी (ता.२२) संस्थेच्या नियामक मंडळाची सभा होणार असून, यामध्ये बडतर्फीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल,’’ असेही ते म्हणाले. काकडे यांच्या आश्वासनानंतर उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: protest rally for indrayani college principal