सनातन संस्थेच्या संभाव्य बंदी विरोधात पुण्यात निषेध मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे : सनातन संस्थेवर बंदीच्या मागणी विरोधात सनातन संस्था, हिंदू जनजागृती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पुण्यात निषेध मोर्चा काढला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सनातन संस्थेच्या साधकांचा हात असल्याची माहिती तपासात समोर येत असल्यामुळे संस्थेवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. 

हा मोर्चा महाराणा प्रताप उद्यान ते कसबा गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आला होता. यावेळी सनातन संस्थेची बदनामी बंद करा, सनातनवरील केलेले आरोप खोटे आहेत, साधकांवरील आरोप खोटे आहेत, सनातनचे सर्व साधक निर्दोष आहेत अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हातात मागण्यांचे फलक घेत अनेक साधक व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. 

नालासोपारा येथून वैभव राऊत या सनातनच्या साधकाला बॉम्ब व बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह राहत्या घरी एटीएसने अटक केली. चौकशीत त्याच्याकडून शरद कळसकर याचे नाव डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी समोर आले. शरद कळसकरकडून सचिन अंदुरेची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अंदुरेला अटक करण्यात आली आहे. मात्र सनातनच्या साधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे सनातनचे म्हणणे आहे. 

दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोळकरांची हत्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी केल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे दाभोळकरांच्या हत्येचा तपास भरकटला. तसेच सनातनवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी घालण्यात येऊ नये. 
- पराग गोखले, हिंदू जनजागृती समिती 

Web Title: The protest rally in Pune against the possible ban on Sanatan Sanstha