नारायणगावातील गैरकारभाराचे पुरावे द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नारायणगाव - अनधिकृत निवासी बांधकामाच्या बेकायदा नोंदी करताना झालेल्या गैरकारभाराचे पुरावे द्या. संबंधितावर कडक कारवाई करतो. पुरावे देऊनही मी कारवाई न केल्यास राजीनामा देऊन घरी बसेन, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांनी दिली.

नारायणगाव - अनधिकृत निवासी बांधकामाच्या बेकायदा नोंदी करताना झालेल्या गैरकारभाराचे पुरावे द्या. संबंधितावर कडक कारवाई करतो. पुरावे देऊनही मी कारवाई न केल्यास राजीनामा देऊन घरी बसेन, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांनी दिली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत डिसेंबरअखेर पुणे जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात तीर्थक्षेत्र असलेल्या परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. दीपावलीनिमित्त स्वच्छता अभियानाची सुरवात देसाई यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी येथील तीर्थक्षेत्र श्री मुक्ताबाई व काळोबा देवस्थानापासून करण्यात आली. स्वच्छता अभियानात पंचायत समिती जुन्नरअंतर्गत ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत सदस्यांनी भाग घेतला. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह हातात झाडू घेऊन देसाई, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्‍याम बनकर, गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला. या वेळी एक ट्रॉली कचरा जमा करण्यात आला. येथील श्री मुक्ताबाई व काळोबा देवस्थान परिसर; तसेच मीना नदीपात्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. याबाबत देसाई यांनी नाराजी व्यक्त करून या भागात कचराकुंड्या ठेवण्याची सूचना सदस्यांना केली. याबाबत सरपंच संध्या रोकडे, उपसरपंच संतोष पाटे, ज्येष्ठ सदस्य संतोष वाजगे, आशिष माळवदकर, रमेश पांचाळ, रामदास अभंग यांनी देसाई यांच्याशी चर्चा केली. अभंग, माळवदकर म्हणाले, ""कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या रोज सकाळी नारायणगाव परिसरात फिरतात. मात्र, सोसायटीतील काही नागरिक कचरा घंटागाडीत न टाकता सोयीनुसार प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून देवस्थान परिसरात टाकतात.''
या वेळी सदस्यांनी गटविकास अधिकारी गाढवे, ग्रामसेवक रोकडे यांच्या कार्यपद्धतीबाबत देसाई यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने देसाई यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र, देसाई यांनी सत्कार घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, ""डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. हा संकल्प पूर्ण होईपर्यंत मी सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.''

Web Title: Provide evidances of Narayangaon corruption