पुणे : मनोरुग्णालयात सुरू होणार पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 15 जानेवारी 2020

- मानसशास्त्र परिचारिका व समाजसेवक प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयात येत्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर मानसोपचार, परिचारिका चिकित्सालयातील मानसशास्त्र व मानसशास्त्रीय समाजसेवक हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. दिवसेंदिवस मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा अभ्यासक्रमांमुळे या क्षेत्रातील मनुष्यबळांची गरज भागणार असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येरवडा मनोरूग्णालयातील रुग्ण संख्या २५४० असून सध्या याठिकाणी नऊशे पुरूष व सहाशे महिला रुग्ण उपचार घेत आहेत. नवीन अभ्यासक्रमाची आवश्‍यकते संदर्भात डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘ रुग्णालयातील रुग्णसंख्या पाहता याठिकाणी पदव्युत्तर मानसोपचाराचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आरोग्य विभागाने घेतला होता. मानसिक आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने केंद्राकडे पदविका व प्रमापणत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने तीन विषयांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कर्वे सामाजिक संस्थेच्या वतीने मानसशास्त्रीय समाजसेवक, परिचारिका चिकित्सालय मानसशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य आणि केंद्राच्या मेडिकल कॉन्सिलची पाहणी झाल्यानंतर पदव्युत्तर मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

मनोरूग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर रुग्णांची मानसिक व शारिरीक चाचणी केली जाते. येथे रुग्णाला शॉक ट्रिटमेंट दिली जाते. त्यापूर्व रुग्णाची रक्त तपासणी,एक्सरे, ईसीजी आदी वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. त्यानंतरच भूल देऊन शॉक ट्रीटमेंटचा उपचार सुरू करतात. या ठिकाणी प्रत्येकी एक इलेक्ट्रोथेरपिस्ट, भूलतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णांचा आजार किती दिर्घ आहे, त्यांची शारीरिक व मानसिक स्थितीवरून त्यांना फिट, अशक्त किंवा सर्वसाधारण कक्षात उपचारासाठी ठेवले जाते. त्यामुळे याठिकाणी मानसोपचार अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिक सोईचे व फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. फडणीस यांनी सांगितले. 

‘‘येरवडा मनोरूग्णालयात येत्या शैक्षणिक वर्षापासून MPhill सायकॅट्रीक सोशल वर्कर, डिप्लोमा इन क्लिनिकल सायकॅट्रीक नर्स हे कोर्स सुरू होणार आहेत. त्यानंतर MD सायकॅट्रिक अभ्यासक्रम सुरू होणार आहे.’’

- डॉ. अभिजित फडणीस, अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychiatry Study will start in Yerwada Mental Hospital