#PUBGFad ‘पबजी’चे ‘फॅड’; तरुणाई ‘मॅड’!

मयूर वाघ 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - ‘गुगल प्ले- स्टोअर’वर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘पबजी’ गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम प्ले लाइव्ह करून खेळणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही तरुण तर दिवस-रात्रभर हा खेळ खेळताना दिसत आहेत.

पुणे - ‘गुगल प्ले- स्टोअर’वर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘पबजी’ गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम प्ले लाइव्ह करून खेळणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही तरुण तर दिवस-रात्रभर हा खेळ खेळताना दिसत आहेत.

सध्या ‘पबजी’ गेमचे फॅड इतके पसरले आहे, की तो कसा खेळावा, शेवटपर्यंत जिवंत कसे राहावे, खेळातले वेगवेगळे मिशन्स कसे पार करावेत, अशा गोष्टींची माहिती इतरांना करून देण्यासाठी अनेक गेमर्सनी स्वतःचे गेमप्ले लाइव्ह करण्यास सुरवात केलेली आहे. आपल्या गेमप्लेला जास्त व्ह्यूज येण्यासाठी हे खेळाडू तासन्‌ तास आपला गेमप्ले लाइव्ह करत आहेत. या लाइव्हलाही कमेंट्‌स, लाइकच्या माध्यमातून तरुणाईचा प्रतिसाद मिळत आहे. सातत्याने खेळणाऱ्यांना यूट्यूबकडून काही अटींवर मोबदलाही मिळत आहे.

वाढत्या लोकप्रियतेमुळे यंदा प्ले-स्टोअरवर पबजी हा सर्वोत्कृष्ट गेम ठरला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सर्वप्रथम विंडोजसाठी या गेमची निर्मिती झाली; पण नंतर सप्टेंबरमध्ये त्याला मूर्त स्वरूप आले. याबरोबर गेमचे ॲन्ड्राइड आणि ‘आयओएस’ सिस्टीमसाठी नवीन प्रकार आले आहेत. गेम खेळणाऱ्यांची वाढती संख्या पाहून हा गेम कदाचित पुढचा ‘ब्लू व्हेल’ तर ठरणार नाही ना, अशी भीती पालकांकडून व्यक्त होत आहे. 

पबजी गेम हिंसकतेकडे झुकत असल्याने त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. गेम खेळून मुलांचा स्वभाव आक्रमक होत असल्याने आणि गेम खेळू न दिल्यास पालक आणि मुलांमधील नात्याला ठेचही पोचत आहे. तसेच, अभ्यास व खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

‘पबजी’मुळे होणारे तोटे
 मानसिक संतुलन बिघडते
 अभ्यास, खेळाकडे दुर्लक्ष
 जागरणामुळे झोप विस्कळित
 आहार, व्यायामाकडेही दुर्लक्ष
 मोबाईल, लॅपटॉपच्या वापरामुळे डोळ्यांना त्रास

नक्की काय आहे पबजी गेम?
पबजी म्हणजे प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड्‌स गेम. यामध्ये १०० खेळाडू एका बेटावर शस्त्रे वापरून इतरांशी लढाई करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे सुरक्षित क्षेत्र वेळोवेळी कमी होते आणि जिवंत खेळाडूंना एकमेकांशी लढण्यासाठी सुरक्षित क्षेत्रात जावे लागते. सर्वांवर मात करून शेवटचा खेळाडू जिवंत राहतो किंवा एखादा संघ जिवंत राहतो, तो या खेळात जिंकला असे म्हटले जाते.

माझा मुलगा १५ वर्षांचा असून दररोज शाळेतून आल्यावर तो पबजी खेळत असतो. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. छोट्या कारणांवरून त्याची चिडचिड होते. 
- सुहासिनी बारटक्के, पालक

मित्रांमुळे ‘पबजी’ची ओळख झाली. आधी वेगवेगळ्या गेम्स खेळत होतो. सध्यातर दिवसभर हाच गेम खेळत असतो. सुटी असेल तर रात्री जागून मित्रांबरोबर हा खेळ खेळतो. 
- अथर्व हगवणे, विद्यार्थी

प्रत्यक्षात न मिळणारा विजय आभासी जगात मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. तात्पुरत्या धुंदीतील आनंदासाठी मुले पबजीसारख्या गेम्स रात्रभर खेळत आहेत. त्यामुळे अभ्यास, खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊन मुलांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे दिसून येत आहे.
- विद्याधर बापट, समुपदेशक

Web Title: PUBG Fad Youth mad