#PucIssue सांगा ‘पीयूसी’ करायची तरी कुठे?

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

ऑनलाइन पीयूसीसाठी अशी करा नोंदणी 

  • https://parivahan.gov.in  या वेबसाइटवर जावे
  • त्यावरील ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ला क्‍लिक करावे. 
  • तेथून पुढे येणाऱ्या लिस्टमधून सर्वांत खाली pucc हा पर्याय निवडावा
  • त्यानंतर ‘सिलेक्‍ट’मधून ‘पीयूसी सेंटर लिस्ट’वर जावे 
  • त्यापुढे राज्य निवडीमध्ये ‘महाराष्ट्र’ पर्याय निवडावा
  • त्यानंतर सिलेक्‍ट ऑफिसमध्ये ‘पुणे’ हा पर्याय निवडून त्यापुढील माहिती भरावी.

पुणे - केंद्र सरकारने वाहनचालकांना प्रदूषण नियंत्रण संगणकीकृत प्रमाणपत्र (पीयूसी) बंधनकारक केल्यानंतर रस्त्यांवरील पीयूसी केंद्र आता दिसेनाशी झाली आहेत. सरकारने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी त्याबाबत नागरिकांमध्ये अद्याप जागृती झाली नाही. यामुळे ‘पीयूसी’ नेमकी करायची तरी कुठे अन्‌ कशी? असे प्रश्‍न वाहनचालकांकडून उपस्थित केले जात आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे २४ सप्टेंबर २०१९ पासून देशातील पीयूसी यंत्रणा ऑनलाइन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन विभागानेही (आरटीओ) पीयूसी केंद्र चालकांना ऑनलाइन यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात आतापर्यंत ५० ते ५५ ऑनलाइन पीयूसी केंद्र सुरू झाली आहेत. मात्र त्याबाबत वाहनचालक अनभिज्ञ आहेत. सहा महिन्यांपूर्वी वाहनांची पीयूसी करून घेतलेल्या प्रमाणपत्राची मुदत आता संपली आहे. मात्र ऑनलाइन सुविधेबाबत माहिती नसल्यामुळे बहुतांश वाहनचालकांचा विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जुन्या केंद्रचालकांनी उत्पादकांकडे अद्ययावत पीयूसी मशिनची मागणी केली आहे. सरकारच्या नव्या सूचनांनुसार उत्पादकांना या मशिनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करायचे आहेत. त्यानंतर ‘आरटीओ’कडून तपासणी केल्यानंतर या मशिनला परवानगी दिली जाते.

माझ्या दुचाकीची पीयूसी करून घेण्यासाठी मी काही दिवसांपासून ‘मोबाईल पीयूसी व्हॅन’चा शोध घेत होतो. परंतु मला ही सुविधा ऑनलाइन झाल्याचे समजले. आता हे पीयूसी केंद्र कुठे शोधायचे, असा प्रश्‍न माझ्यासमोर आहे.
- संजय चव्हाण, वाहनचालक. 

शहरात तीनशेहून अधिक पीयूसी केंद्रे होती. त्यापैकी काही बंद होती. नव्या नियमानुसार ऑनलाइन पीयूसी केंद्रांची संख्या आता ५५ ते ६० इतकी झाली असून, त्यात वाढ होत आहे. येत्या दोन महिन्यांत शंभरहून अधिक ऑनलाइन पीयूसी केंद्र उपलब्ध होतील. 
- विनोद सगारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puc Issue rto online central government