'पु.ल.' जसे होते तसेच दाखवले : महेश मांजरेकर

'पु.ल.' जसे होते तसेच दाखवले : महेश मांजरेकर

पुणे : पु. ल देशपांडे चेन स्मोकर होते, त्यांनी मद्यपानावर एक लेखही लिहिला होता. ते मद्यपान करायचे, सिगारेट ओढायचे याचा अर्थ असा नाही, की त्यांची प्रतिभा कमी होती. ते जसे होते तसेच चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरण "भाई- व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिले. 

"भाई' चित्रपटाचा उत्तरार्ध 8 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चित्रपटात "पुलं'ची व्यक्तिरेखा साकारणारे सागर देशमुख, वृद्धापकाळातील "पु.ल.' साकारणारे विजय केंकरे, सुनीताबाईंची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी दामले, अश्‍विनी गिरी आणि निर्माते निखिल साने उपस्थित होते. 

"भाई'चा पूर्वार्ध 4 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. त्यातील काही दृश्‍यांबाबत ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, संपूर्ण चित्रपटात पु.ल. देशपांडे अनेकदा मद्यपान करताना दिसतात. या दृश्‍यांवरही त्यांनी आक्षेप घेतला होता. यावर मांजरेकर म्हणाले, ""कोणत्याही चित्रपटाबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. चित्रपटाची निर्मिती डोळ्यांत तेल घालून केली आहे. काही आक्षेप असेल, तर चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सांगावे.

तसेच अन्य व्यक्तिरेखा विस्तृतपणे मांडता येत नाहीत, ही चित्रपटाची मर्यादा असते. आक्षेपांना उत्तर देत बसलो, तर चित्रपट करणे थांबवावे लागेल. तरीही कोणाला चर्चा करायची असल्यास आम्ही तयार आहोत.'' 

...म्हणून चारित्र्यहनन होत नाही 

केंकरे म्हणाले, ""एकदा रात्री अडीच वाजता माझ्या घरी पं. भीमसेन जोशी आले. माझ्या वडिलांना "कुठली दारू आहे तुझ्याकडे?' असे विचारले. मोठे कलाकार एकमेकांच्या घरी जाऊन रात्रभर गाण्यांच्या मैफली जमवत. त्यामुळे एखाद्याजवळ मद्याचा ग्लास असल्याने त्याचे चारित्र्यहनन होत नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com