डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुनाळेकर आणि भावेंच्या सीबीआय कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे.
 

तपासा दरम्यान, सीबीआय ने पुनावलेकर यांच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला आहे. ते पुढे न्यायवैद्यकीय मानसशास्त्त्रीय विश्लेषणसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्या अहवालानुसार चौकशी करायची असल्याने दोघांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला. संजीव पुनावलेकर यांनी आरोपीना गुन्ह्यात वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला. हे वकिली नियमांचे उल्लंघन आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्या डेटाचे विश्लेषण करण्याचे काम अद्याप सुरू आहे. तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असल्याने विक्रम भावे याच्याकडे सखोल चौकशी करायची आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात अनेक आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्यासाठी दोघांनाही अतिरिक्त 14 दिवस सीबीआय कोठडी द्यावी. असा युक्तिवाद सीबीआयचे विशेष सरकारी वकील ऍड प्रकाश सूर्यवंशी यांनी केला. 

या गुन्ह्यातील आरोपी शरद कळसकर याने दुसऱ्या गुन्ह्यात दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे याना अटक करण्यात आली आहे. कळसकर याच्या जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. आपल्या अशीलाला सल्ला देणे हा गुन्हा नाही. असे झाले तर वकिलांना आपले काम करणे अवघड होईल. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ देत केलेली अटक कशी चुकीची आहे हे न्यायालयास सांगण्यात आले. तसेच अटक करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे देखील सीबीआयकडे नाहीत. दोघांवरही दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील ऍड सुभाष झा आणि अॅड गणेश उपाध्याय यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडताना सूर्यवंशी म्हणाले, योग्य चौकशी केल्यानंतरच दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्यास सांगणे हा कायदेशीर सल्ला नाही. तसेच आरोपीच्या अटकेला आव्हान करायचे असेल त्यावर सर्वोच्च न्यायालयात जावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punalekar and Bhav's CBI custody have been Increase till June 4 in Dr. Dabholkar murder case