द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; तहसीलदार, कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

सलग दुसऱ्या वर्षी या भागातील द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक कुटुंबातील सदस्य मानसिक तणावखाली आहेत.

नारायणगाव (पुणे) : अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यात नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे शनिवारी (ता.९) सकाळपासून कृषी, महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसिलदार हनुमंत कोळेकर, कृषि अधिकारी बापू रोकडे यांनी दिली.

गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते शुक्रवारी सकाळी सहा या वेळेत जुन्नर तालुक्यातील द्राक्ष पट्टा म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव, गुंजाळवाडी, वारुळवाडी, येडगाव, खोडद, मांजरवाडी, नारायणवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला.

अखिल मंडई मंदिर चोरी तपासाला वेग; पोलिसांची तीन पथके चोरट्याच्या मागावर​

या भागात सरासरी ५२ मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती कृषि अधिकारी प्रमोद बनकर यांनी दिली. सुमारे बारा तास द्राक्षाच्या घडामध्ये पाणी राहिल्याने छाटणीनंतर ९० ते १२० दिवस झालेल्या परिपक्व अवस्थेतील द्राक्ष घडाचे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या मण्यांना चिरा पडल्याचे दिसत आहे. शनिवारी सकाळी धुके आणि दव पडल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी या भागातील द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक कुटुंबातील सदस्य मानसिक तणावखाली आहेत. तहसीलदार कोळेकर, कृषि अधिकारी बापू रोकडे, बनकर यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. नुकसानीची स्थिती पाहून पंचनामे करण्याचे आदेश दिले. शनिवारी सकाळपासून येडगाव, नारायणगाव, गुंजाळवाडी, खोडद परिसरात पंचनामे सुरू केले असून दोन दिवसात पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे.

दहावी पास विद्यार्थ्यांनो, ITI ऍडमिशनसाठी करा ऑनलाइन अर्ज; वाचा सविस्तर​

येडगाव परिसरात १४ मे २०२० रोजी गारपीट झाली होती, त्या नंतर ३ जून २०२० रोजी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. गुरुवारी ४२ मी.मी पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. १४ मे २०२० रोजी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र अद्याप एक रुपयांची नुकसान भरपाई मिळाली नाही. पुन्हा पंचनामे सुरू झाले आहेत. निसर्ग कोपला असून शासनानेसुद्धा वर हात केल्याने शेतकरी मात्र हतबल झाला आहे.
- गुलाबराव नेहेरकर, माजी सरपंच, येडगाव

संभाजी भिडे सात वर्षांनंतर वढूमध्ये आले आणि लगेच निघूनही गेले​

द्राक्ष पॅकेज देण्याची मागणी

वर्षभरात द्राक्ष बागेला एकरी साडेतीन लाख रुपये भांडवली खर्च होतो. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त द्राक्ष बागेला एकरी सात हजार रुपये तुटपुंजे अनुदान दिले जाते. भांडवली खर्च पाहता आणि सलग दुसऱ्या वर्षी नुकसान झाल्याने उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने द्राक्ष बागा वाचवण्यासाठी एकरी पन्नास हजार रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punchnama of vineyards damaged in Junnar taluka due to premature rains is in progress