एकटक बघणाऱ्याला हटकल्याने इंजिनिअर तरुणीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

रसिला राजू ओपी (वय 25, रा. हिंजवडी, मूळ रा. केरळ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती हिंजवडीच्या इन्फोसिस आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होती. 

पुणे - एकटक बघणाऱ्याला जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला राजू ओपी हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपी सुरक्षा रक्षकानं स्वत:च पोलिसांकडं तशी कबुली दिली आहे. खून करून आसाममध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हिंजवडी पोलिसांनी आज (सोमवार) पहाटे त्याला अटक केली आहे.

इन्फोसिस कंपनीच्या हिंजवडी फेज २ मधील कार्यालयात काल सायंकाळी कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिला ओपी हिचा खून करण्यात आला होता. ही घटना समजल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वेगाने हालचाली करून बबन नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन हा इन्फोसिस कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर, रसिला राजू ओपी (२४) ही त्याच कंपनीत कम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करीत होती.

बबनला एसडीबी १० या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर ड्युटी लागली होती. रविवार असल्यामुळे या मजल्यावर कमी कर्मचारी होते. ही संधी साधून बबन रसिलाकडे एकटक नजरेने पाहात होता. त्यावरून रसिलाने त्याला 'असे काय पाहतो' म्हणत हटकले. ई मेलवरून तुझी तक्रार करते आणि नोकरी घालवते असे म्हणून ती आत गेली; तेव्हा तो तिच्या पाठोपाठ मिटिंगरूममध्ये गेला. तिची माफी मागितली आणि कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिलाचा खून केला. त्यानंतर बबनने तेथून पळ काढला.

मूळगावी आसामला जाण्यासाठी तो मुंबईला गेला. दरम्यान, रसिला हिचा संपर्क होत नसल्याचे तिच्या वरिष्ठांनी कंपनीत कळवले होते. कंपनीतील अन्य सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला असता रसिलाचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांना ही माहिती मिळताच कंपनीतील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बबनला मुंबई येथून पहाटे अटक केली.

Web Title: Pune: 25-year-old woman techie murdered in Infosys office