रसिलाच्या स्वप्नांचा करुण अंत; सोशल मीडियावर 'बाजार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

कशी कराल तक्रार? 
मोबाईल, ई-मेल किंवा सोशल मीडियाद्वारे लैंगिक शोषण किंवा अश्‍लील संदेश येत असल्यास "crimecyber.pune@nic.in' या ई-मेलवर लेखी तक्रार अर्ज करावा. या अर्जाची "सायबर सेल'तर्फे तातडीने दखल घेण्यात येते. तक्रार करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात येतो, जबाब घेतला जातो. त्यानंतर त्रास देणारी व्यक्ती शोधण्यात येते आणि त्यावर गुन्हा दाखल होतो. 

पुणे - सॉफ्टवेअर इंजिनिअर रसिला राजू ओपी ही केरळमध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत 98 टक्‍के मार्क मिळवून "टॉपर' बनली होती. इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केल्यानंतर केरळ येथेच इन्फोसिस कंपनीत तिची निवड झाली होती.

अलीकडेच तिला लग्नाबाबत प्रस्ताव आल्याने वडिलांनी तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली होती; पण एका माथेफिरू सुरक्षारक्षकाने तिच्या स्वप्नांचा चुराडा केला. 
हिंजवडी येथील इन्फोसिस आयटी कंपनीत काम करणाऱ्या रसिलाचा रविवारी सुरक्षारक्षकाने केबलने गळा आवळून खून केला. तिच्या आठवणी सांगताना मैत्रिणींना दु:खावेग आवरत नव्हता. रसिला ही मूळची कालिकत येथील कुंदमंगलम या गावची. वडील होमगार्डच्या सेवेत; तर आई गृहिणी. आर्थिक स्थिती बेताचीच. ती शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होती. ती शाळेत आणि महाविद्यालयात ती सतत "टॉपर' असायची. सुमारे तीन वर्षांपूर्वी आई पुष्पलता यांचे काविळीच्या आजाराने निधन झाले. हलाखीची परिस्थिती असतानाही वडिलांनी रसिला आणि तिचा मोठा भाऊ लेजनकुमार यांना शिक्षण दिले. लेजनकुमार अबुधाबी येथे एअरलाइन्स कंपनीत कामास आहे. त्याचा मोठा आधार गरीब कुटुंबाला मिळाला होता. मुलगीही चांगल्या कंपनीत रुजू झाल्याने ते चांगल्या भविष्याची स्वप्ने रंगवत होते. 

रसिलाच्या खुनाच्या घटनेमध्ये सुरक्षारक्षकच नव्हे; तर आणखी एक जण सहभागी असल्याची शक्‍यता आहे. तो कंपनीतलाच असावा, असा आरोप करून "एकटीला कामावर बोलावल्यानंतर सुरक्षेची खबरदारी कंपनीने घेणे अपेक्षित होते', असे रसिलाचे वडील राजू ओपी म्हणाले. मुलीला कंपनीतील एक अधिकारी सतत त्रास देत होता, असा आरोपही त्यांनी केला. कंपनीत तिच्या विभागात सुरक्षारक्षकाने संगणक डिटेल्स घेण्याच्या बहाण्याने प्रवेश मिळविला, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सुरक्षारक्षकाला कोणते डिटेल्स घ्यायचे होते, कार्यालयातील कामाशी सुरक्षारक्षकाचा काय संबंध येतो, असा सवाल तिची मैत्रिण शायनी नौशाद यांनी उपस्थित केला आहे. 

रसिलाने सुरक्षारक्षकाविरुद्ध कंपनीकडे तक्रार केली होती. शिवाय, कंपनीतील एका अधिकाऱ्याकडून तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे तिने बदलीची मागणीही केली होती, असे त्यांनी सांगितले. रसिलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी मुंबई येथून कालिकत (केरळ) येथे नेण्यात येईल. त्यानंतर तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे; या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे इन्फोसिस कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

सोशल मीडियावर रोमिओंचा 'बाजार' 
"तू खूप सुंदर दिसतेस, मला तुझा आवाज ऐकायचा आहे, तू मला कधी भेटशील, प्लीज एकदा बोल माझ्याशी,'... रात्री दीड वाजता माझ्या मोबाईलवर फेसबुक मेसेंजरद्वारे हे संदेश येत होते. सुरवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र हा प्रकार सुरूच राहिला. अखेर संग्रामराजे भोसले पाटील नावाच्या "त्या' मुलाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. या सर्व चॅटिंगचे "स्क्रीनशॉट' घेऊन माझ्या फेसबुकच्या टाइमलाइनवर टाकले. कोणा अपरिचित व्यक्तीला घाबरण्यापेक्षा त्याने केलेल्या गैरकृत्याचे पुरावे सोशल मीडियावर टाकून त्याचे वाभाडे काढणेच मला योग्य वाटले. 

चिन्मयी सुर्वे या मुलीची ही प्रतिक्रिया. नुकतेच एका मुलाच्या गैरवर्तनाला कंटाळून संपूर्ण घटनेची माहिती आणि संबंधित मुलाचे नाव व मोबाईल क्रमांक चिन्मयीने फेसबुक अकाउंटद्वारे जगजाहीर केला. यापूर्वीही एका दिल्लीतील मुलीने तिला त्रास देणाऱ्या मुलाच्या नावाने आलेले धमकीचे ई-मेल सोशल मीडियाद्वारे लोकांसमोर आणले होते. यावरून लैंगिक छळाच्या आणि छेडछाडीच्या विरोधात सोशल मीडियाद्वारे आवाज उठविणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. 

चिन्मयीच्या बाबतीत घडलेला प्रकार अद्यापही थांबलेला नाही. सोशल मीडियावर थेट पोस्ट केल्यामुळे "चिडलेल्या' त्या मुलाने तिला धमकावण्यास सुरवात केली आहे. "तुला काय वाटतं, तू खूप शहाणी आहेस का ? स्वतःला भारी समजते का ? मी तुला तुझी जागा दाखवून देतो !' असे संदेश आता तो मुलगा चिन्मयीला पाठवत आहे. मात्र चिन्मयी त्या मुलाच्या विरोधात सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

"फेसबुकवर घटनेची माहिती टाकल्यावर मला माझ्या मित्र-मैत्रिणी व परिचितांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद आणि आधार मिळाला. अनेक मुलांनी संपर्क साधून या लढाईत आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि कधीही मदत करण्याची ग्वाही दिली, त्यामुळे अशाप्रकारचा छळ सोसण्यापेक्षा थेट वाभाडे काढण्याचा पर्याय मुलींनी स्वीकारावा असे मला वाटते,'' असेही चिन्मयीने सांगितले.

तक्रार देण्यासाठी प्रत्येकीने पुढे यावे' 
"फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा गैरवापर करून मुलींना त्रास देण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत असले, तरी प्रत्यक्षात पोलिसांकडे तक्रारीसाठी फक्त निम्म्याच मुली पुढाकार घेत आहेत. त्यामुळे "तक्रार देण्यासाठी प्रत्येकीने पुढे यावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल,'' असे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके यांनी केले आहे. सायबर शाखेकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये अश्‍लील बोलणे, अश्‍लील संदेश पाठविणे याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या घटनाही तुलनेने अधिक आहेत. काही वेळा अनोळखी क्रमांकावरून संदेश किंवा फोन येतो. मात्र, चौकशीदरम्यान तो क्रमांक ओळखीच्या व्यक्तीचा असल्याचे समजते. अनोळखी व्यक्तीकडून येणारे संदेश किंवा फोन याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, असेही फडके यांनी नमूद केले. 

तुमच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा असाही होतोय वापर 
आपण मोबाईलवर वेगवेगळे ऍप डाउनलोड करताना किंवा मोबाईलवरून "जी-मेल'चा वापर करताना येणारे नोटिफिकेशन न वाचता मान्य करत असतो. खरंतर यातील बहुतांश नोटिफिकेशन्स्‌मध्ये "तुमच्या फोनमधील किंवा ई-मेलवरील माहितीचा (डाटा) वापर आम्ही करू,'' असेही नोंदविलेले असते; परंतु त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अशा स्वरूपात जमा होणारी माहिती विकणाऱ्या "रॅकेट'चे जाळेही अस्तित्वात आहे. या "रॅकेट'च्या माध्यमातून आपले क्रमांक, ई-मेल इतरांना मिळतात. त्यातूनच कित्येक वेळा अनोळखी व्यक्तींकडून ई-मेलवर किंवा मोबाईलवर त्रास देण्याचे प्रकार घडतात. 

गेल्या वर्षभरात नोंदविलेल्या (अंदाजे) तक्रारी :- 
अश्‍लील संदेश : 40 
मोबाईलवरून धमक्‍या देणे : 30 
ई-मेलचा वापर करून पाठविलेले अश्‍लील संदेश : 35 
सोशल मीडियाद्वारे होणारे शोषण : 30 

कशी कराल तक्रार? 
मोबाईल, ई-मेल किंवा सोशल मीडियाद्वारे लैंगिक शोषण किंवा अश्‍लील संदेश येत असल्यास "crimecyber.pune@nic.in' या ई-मेलवर लेखी तक्रार अर्ज करावा. या अर्जाची "सायबर सेल'तर्फे तातडीने दखल घेण्यात येते. तक्रार करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात येतो, जबाब घेतला जातो. त्यानंतर त्रास देणारी व्यक्ती शोधण्यात येते आणि त्यावर गुन्हा दाखल होतो. 

Web Title: pune 25 year old woman techie murdered infosys office