#PuneAccident ब्रेक फेल ट्रकची वाहनांना धडक

Pune-Accident
Pune-Accident

धायरी - नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान ब्रेक फेल झालेल्या भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये अकरा जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नवले रुग्णालयामध्ये दाखल केले. हा अपघात आज सकाळी ११ च्या दरम्यान हॉटेल विश्‍वसमोर झाला.

तमिळनाडूमधून मुंबईकडे नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रकचा (टीएन २८, एएच ७०६३) ब्रेक नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान तीव्र उतारावरच फेल झाला. त्यामुळे या ट्रकने टेंपो, दोन कार, एक रिक्षा अशा विविध वाहनांना जोराची धडक दिली. यात अकरा जण जखमी झाले. यामधील एक महिला आणि एका पुरुषाची प्रकृती गंभीर आहे. 

अपघातानंतर नवले पूल व त्यापुढील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालक एन. रवी नागन (रा. वेल्ली केनपट्टी, तमिळनाडू) याला ताब्यात घेतले आहे. या अपघाताची फिर्याद विलास मारुती चंदेवाड (वय ४३, रा. कोंढवा) यांनी दिली आहे.सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, दत्तवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संपतराव भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तसेच जखमींना रुग्णालयामध्ये पोचविण्यासाठी मदत केली.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे - धरमपाल रामआसरे भारती (वय ४०, रा. उरुळी देवाची), परशुराम कल्लू यादव (वय ३९ रा. उरुळी देवाची), प्रकाश गोगावले (रा. गोगलवाडी), दशरथ लिंगप्पा बहिरे (वय २६, रा. कोंढवा), निंबराज वसंत पाटील (वय ६२, रा. मुंबई), बालाजी जूनेस अहिरे (वय ३२, रा. वारजे), एक अज्ञात महिलेसह इतर 

परिसरात अनेक अपघात
वडगाव पूल परिसरामध्ये यापूर्वीही अनेक मोठे अपघात झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी इथे एक क्रेनही डिव्हायडर तोडून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेली होती. एका वर्षाच्या कालावधीत अपघातात एकाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

या रस्त्यावर हायवे ऑथोरिटीने वेगमर्यादेचे फलक, तसेच दिशादर्शक फलक लावून उपयोजना करावी, तसेच वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी. नवले पुलाच्या चौकातून सेवा रस्त्याने मुंबईकडे वाहने येथूनच जातात. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. तसेच, अनेक प्रवासी रस्त्यावरच उभे असतात.
- सरदार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

नवले पुलाकडून वारज्याकडे जात असताना आमच्या गाडीला ट्रकने पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली आहे. तसेच, इतर वाहनांनाही धडक दिली. खरं तर काळ आला होता; पण वेळ आली नव्हती.
- दशरथ बहिरे, जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com