शिक्षण विभागातील लेखाधिकारी लाच घेताना ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

सेवा पुस्तिकेत वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विभागातील वरिष्ठ महिला लेखाधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले.

Bribe : शिक्षण विभागातील लेखाधिकारी लाच घेताना ताब्यात

पुणे - सेवा पुस्तिकेत वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विभागातील वरिष्ठ महिला लेखाधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

प्रमिला प्रभाकरराव गिरी (वय ३८, वरिष्ठ लेखाधिकारी वर्ग-२) असे कारवाई करण्यात आलेल्या महिला लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवा पुस्तिकेत नोंद केली जाते. सहावा आणि सातव्या वेतन आयोगानुसार सेवा पुस्तिकेत वेतन निश्चित करण्यासाठी लेखाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक असतो.

त्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार एका शिक्षकाने केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता गिरी यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी रियाज शेख, सुनील सुरडकर यांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजता छापा टाकून लेखाधिकारी गिरी आणि कनिष्ठ लेखापरीक्षक अनिल श्रीधर लोंढे या दोघांना ताब्यात घेतले. कार्यालयाची झडती घेतली असता टेबलच्या ड्रावरमध्ये सुमारे ६० हजार रुपये आढळून आले. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.