
Pune : संशयावरुन शारीरिक आणि मानसिक छळ; तिहेरी तलाकप्रकरणी पतीविरुद्ध कारवाई
पुणे - विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने पतीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, त्याला जामीन दिला आहे. दरम्यान, सासू, सासरा, नणंद आणि नंदावा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रिपल तलाकप्रकरणी पतीला अटक झाल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२२ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली.
या संदर्भात २३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेवर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीने तीन वेळेस तलाक म्हणत नांदवण्यास नकार दिला. तसेच, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास नणंदेच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यावरून खडकी पोलिसांनी पती अकीब आयुब मुल्ला (वय ३१, रा. नवीन नाना पेठ, पद्मजी पार्क, पुणे) याला अटक केली. पतीसह सासू, सासरा, नणंद आणि नंदावा यांच्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध नऊ मे रोजी खडकी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ मे रोजी पतीला तिहेरी तलाकच्या गुन्ह्यात अटक केली.