Pune: विमान कंपन्यांच्या अज्ञानाचा पुण्यातील प्रवाशांना आर्थिक फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान कंपन्यांच्या अज्ञानाचा पुण्यातील प्रवाशांना आर्थिक फटका

विमान कंपन्यांच्या अज्ञानाचा पुण्यातील प्रवाशांना आर्थिक फटका

पुणे : विमान कंपन्या, त्यांचे बुकींग एजंट आणि काही संकेतस्थळांमधील विसंवादाचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे रविवारी उघड झाले. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असतानाही पुण्यात येताना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे बंधन प्रवाशांना त्यांच्याकडून घालण्यात येत आहे. परिणामी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून मनस्तापही सोसावा लागत आहे. मात्र, कोथरूडमधील प्रवाशाने त्याविरोधात आवाज उठविल्यावर शासकीय यंत्रणांनी त्यांची चूक मान्य केली.

कोथरूडमधील रहिवासी श्रीकांत आठवले यांनी या बाबत विमानतळ प्रशासन, महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्याकडे रविवारी तक्रार नोंदविली. त्यातून विमान कंपन्यांमधील विसंवाद उघड झाला. आठवले हे ९ नोव्हेंबरला चंदीगडमार्गे लुधियाना येथे गेले होते. तेथून १३ नोव्हेंबरला ते पुण्याकडे परतले. परतताना माय ट्रीप या संकेतस्थळावरून तिकिट बुक केले होते. प्रवास करण्याच्या अगोदर त्यांना पुण्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल, असे माय ट्रीपकडून सांगण्यात आले. आठवले यांनी ‘माझे दोन्ही डोस काही महिन्यांपूर्वीच झाले आहे. तसेच प्रवासासाठी राज्य सरकारचा युनिर्व्हसल पासही काढला आहे’ असे त्यांनी सांगितले. परंतु, माय ट्रीपकडून त्यांना पुणे महापालिकेच्या नियमाची अंमलबजावणी करावीच लागेल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

त्यामुळे आठवले यांनी लुधियानामध्ये आऱटीपीसीआर चाचणी केली. ती निगेटिव्ह आली. परंतु, रिपोर्ट पंजाबी भाषेत असल्यामुळे नंतर त्यांना त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून घ्यावे लागले. पुण्यात आल्यावर त्यांनी विमानतळावर चौकशी केली. तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना, युनिर्व्हसल पास असला तरी, आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट लागतोच, असे सांगितले. त्यामुळे आठवले यांनी विमानतळ प्रशासनाकडे तक्रार नोंदविली. तसेच रविवारी सकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडेही तक्रार केली. त्याची प्रत त्यांनी ‘सकाळ’ला पाठविली.

या बाबत आठवले म्हणाले, ‘‘दोन डोस झाल्यावरच प्रवासासाठी राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास मिळतो. देशात तो सर्वत्र चालतो. परंतु, पुण्यात येताना महापालिकेचे नाव पुढे करून तो पास चालणार नाही, असे सांगितले जाते. हे चुकीचे आहे. त्यामुळेच मी महापालिका, विमानतळ प्रशासनाकडे तक्रार केली. प्रवाशांची अडवणूक करून चाचणी करून घेण्यासाठी त्यांना भाग पाडले जात आहे.’’

दोन डोस झाले असेल तर पास नको

या बाबत महापालिकेचे उपआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात विमानाने येताना संबंधित प्रवाशांकडे कोरोनाचे दोन झाल्याचे प्रमाणपत्र असेल तर, त्यांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागत नाही. मात्र, दुसरा डोस झाल्यावर प्रवासासाठी किमान १५ दिवसांचे अंतर हवे.’’ विमानतळावरील संबंधित अधिकारी, कर्मचारी या बाबत पुन्हा सांगण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: PMAY-G : मोदींनी १.४७ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले ७०० कोटी

विमान कंपन्यांनाही सांगणार

लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, ‘‘दोन डोस घेतल्याचा आणि १५ दिवस झाले असल्याचा प्रवाशांकडे पुरावा असेल तर, त्यांना कोणत्याही पासची गरज नाही अथवा आरटीपीसीआर चाचणीचीही आवश्यकता नाही. विमानतळ कंपन्यांनाही या बाबत पुन्हा एकदा सांगितले जाईल.’’

विमानतळावर रोज ४०० चाचण्या

पुणे विमानतळावरून सध्या रोज १०० ते १०८ उड्डाणे होत आहेत. अहमदाबाद, बंगळुरू, नागपूर, लखनौ, जयपूर, दिल्ली, चेन्नई, भुवनेश्वर, कोलकत्ता, हैदराबाद, भोपाळ, इंदोर, अलाहाबाद, कोची, गोवा, रायपूर, पाटणा, चंदीगड, तिरूपती १९ शहरांत विमानसेवासुरू आहे. सुमारे १५ ते १८ हजार प्रवासी रोज- ये -जा करीत आहेत. त्यातील सुमारे ३०० ते ४०० प्रवाशांना रोज आरटीपीसीआर चाचणी करावी लागत आहे.

loading image
go to top