
पुणे : मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या चोराला अद्याप अटक नाही
किरकटवाडी : सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी येथील मारुती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याच्या घटनेला महिना होत आला तरी हवेली पोलीसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. महत्वाचे म्हणजे स्थानिक नागरिकांनी चोरी झाली त्याच दिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोच्या आधारे परिसरात शोध घेऊन चोराचे घर शोधून काढले होते, मात्र तरीही पोलीस अत्यंत संथ कारवाई करत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
दि. 12 एप्रिल 2022 रोजी पहाटे नियमित काकड आरतीसाठी मारुती मंदिरात आलेल्या नागरिकांना मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलुप तोडून दानपेटी फोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक चोर त्यामध्ये चोरी करताना दिसून आला. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व इतर ऐवज चोर दानपेटीतून काढत असल्याचे स्पष्ट दिसत होते. याबाबत नागरिक दशरथ करंजावणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन वेळा येऊन मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.
नागरिक विकास हगवणे व इतरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोच्या आधारे परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता एका ठिकाणी कामगारांनी तो फोटो ओळखला व त्याचे किरकटवाडीतील घर दाखवले. स्थानिकांनी ही माहिती पोलीसांना दिली.पोलीस तेथे गेले तेव्हा तो फरार झाला होता. घरात त्याचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे मिळाली त्यावरून चोराचे नाव लक्ष्मण देविदास पुयड (वय 31, मुळ रा. नायगाव जि. नांदेड) असल्याचे कळले.
"दोन वेळा पोलीस येऊन गेले. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले नाही. दानपेटी फोडून चोरी होण्याची ही चौथी वेळ आहे. चोराचे घर शोधून दिले तरी पोलीस का कारवाई करत नाहीत हे कळत नाही."
विजय हगवणे, नागरिक किरकटवाडी.
"चोराची ओळख पटलेली आहे. त्याचे मोबाईल लोकेशन काढण्यात आले, परंतु तो सारखे ठिकाण बदलत आहे. सध्या त्याने मोबाईल बंद केलेला आहे. त्याच्या घरच्यांशी संपर्क झाला आहे. दोन दिवसांत त्याच्या मुळ गावी जाणार आहोत."
अशोक तारु, पोलीस नाईक (तपास अधिकारी), हवेली पोलीस स्टेशन.
Web Title: Pune Against Thief Broke Temple Donation Box
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..