Pune परतीच्या पावसात शेती आणि तरकारी वाहून गेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : परतीच्या पावसात शेती आणि तरकारी वाहून गेली

उंड्री : मागिल आठवड्याभरापासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेताचे बांध फुटले, शेती, तरकारी पिकेही वाहून गेली. हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतल्याची व्यथा मांजरी उपबाजारामध्ये तरकारी विक्रीसाठी आलेल्या काशीनाथ विरकर (लोणी काळभोर), पांडुरंग गायकवाड (वडकी), वैशाली धुमाळ (थेऊरफाटा), सुनील खेडेकर (उरुळी कांचन) या शेतकऱ्यांनी मांडली.

रामभाऊ मोरे (कुंजीरवाडी), गोरख झांबरे (होळकरवाडी) म्हणाले की, मोलामहागाईचे बियाणे आणायचे, मशागतीसाठी खर्च करायचा, रात्रंदिवस कष्ट करायचे आणि निसर्गाची अवकृपा झाली की, सारे होत्याचे नव्हते होते. शेतकऱ्यांना हातात काहीच मिळत नाही. कारखान्यामधील उत्पादित मालाला हमीभाव आहे. मात्र, शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, त्याच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी सरकार कधी विचार करणार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेतामध्ये राबराब राबायचे आणि शेतमाल बाजारात घेऊन आले की, त्याला भाव मिळत नाही. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मुळा, कोथिंबीर, मेथी शेतात कुजली. मेहनत, बियाणे आणि मशागतीचा खर्च कोणाकडे मागायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे, अशी विचारणा टेकवडी (ता. पुरंदर) येथील प्रियंका इंदलकर आणि भिवराज थोरात (उरुळी कांचन) यांनी उपस्थित केला.

शेतपिक काढणीला आले आणि मागिल आठवड्यापासून सलग पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोथिंबीर, मेथी सडून गेली. बियाणाचा खर्चसुद्धा निघाला नाही. शेती करावी की नाही.

जया काळभोर, लोणीकाळभोर

शेतकऱ्यांकडे शेतमाल असतो, तर बाजार नसतो आणि अवकाळी किंवा पाण्याअभावी शेतमाल नसतो, तर बाजारभाव असतो. शेतमाल विक्रीतून अनेक वेळा टेम्पोचे भाडेसुद्धा निघत नाही.

सुवर्णा चोरघडे, फुरसुंगी

दरम्यान, मांजरी उपबाजारप्रमुख विजय घुले म्हणाले की, मागिल आठवड्यापासून पावसामुळे तरकारीची आवक-कमी जास्त होत आहे. मात्र, पावसामुळे व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. पावसामध्ये पालेभाज्या भिजल्या की, खराब होतो, असे त्यांनी सांगितले.