सुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त; ट्रॉलीची प्रतीक्षा, कॅबसाठी पायपीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Airport

पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधा पुरविण्यात विमानतळ प्रशासन अपयशी ठरत आहे.

Pune Airport : सुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त; ट्रॉलीची प्रतीक्षा, कॅबसाठी पायपीट

पुणे - पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधा पुरविण्यात विमानतळ प्रशासन अपयशी ठरत आहे. विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर बॅग घेऊन जाण्यासाठी ट्रॉलीची ३० ते ४० मिनिटे वाट पाहावी लागत आहे, तर दुसरीकडे आता ‘कॅब’चे पार्किंग एरोमॉलमध्ये स्थलांतर झाल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन मॉलपर्यंत पायपीट करावी लागते. प्रवाशांना जेवढा वेळ विमान प्रवासासाठी लागतो, तेवढाच वेळ ट्रॉली आणि कॅबसाठी जातो.

प्रवाशांसह विमानांची संख्या वाढल्याने पुणे विमानतळावरील सुविधा अपुऱ्या पडत आहे. याशिवाय, काही विमानांना उशीर तर रद्द होणाऱ्या विमानांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे विमानांच्या वाहतुकीचे नियोजन कोलमडत आहे. लगेज बेल्टवर एकाचवेळी तीन तर कधी चार विमानांच्या प्रवाशांचे लगेज येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना लगेज शोधण्यासाठी व मिळण्यासाठी ३० ते ४० मिनिटे वाट पहावी लागत आहे. लगेज घेऊन निर्गमन गेटमधून बाहेर पडल्यावर ट्रॉलीची शोधाशोध करावी लागते. ट्रॉलींची संख्या कमी पडत असल्याने येथे देखील ३० ते ४० मिनिटे वाट पाहण्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. याचबरोबर कॅबसाठीही प्रवाशांना वाट पहावी लागते. यासंदर्भात विमानतळ संचालक संतोष ढोके म्हणाले, ‘‘ ट्रॉलीसंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी आल्यामुळे दोन दिवसांत २०० नवीन ट्रॉली घेत आहोत. प्रवाशांना सुविधा मिळेल, याचे नियोजन सुरू आहे.’’

लगेज घेऊन जावे लागते चालत

पुणे विमानतळ परिसरात असलेले ‘कॅब’चे पार्किंग मल्टिलेव्हल कार पार्किंग असलेल्या एरोमॉलमध्ये २६ नोव्हेंबर रोजी स्थलांतर केले. त्यामुळे विमानतळाच्या बाहेरील वाहतूक कोंडी कमी झाली; पण प्रवाशांना मात्र पायपीट करावी लागत आहे. ट्रॉली वेळेत मिळाली नाही, तर प्रवासी आपले लगेज घेऊन चालतच मॉलमध्ये येतात. विमानतळाच्या समोरचा रस्ता ओलांडून येणे अथवा पादचारी पुलावरून चालत येणे असे दोनच पर्याय प्रवाशांपुढे आहेत. मात्र, लगेज घेऊन चालत जाणे त्रासदायक ठरत आहे. याशिवाय, तेथे गेल्यावर कॅबसाठीही तीन ते पाच मिनिटे थांबावे लागते.

नागपूर-पुणे विमानाने मी पुणे विमानतळावर दाखल झालो. त्या वेळी ट्रॉलीसाठी मला किमान ३० मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. शोधाशोध केल्यानंतर ट्रॉली मिळाली. विमानतळ प्रशासनाने ट्रॉलीसारख्या प्राथमिक सुविधेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

- अभिजित संकपाळ, प्रवासी

  • १८६ - दररोज विमानांची ये-जा

  • २६ हजार - दररोजच्या प्रवाशांची संख्या

टॅग्स :puneAirportPassengers