पुणे विमानतळावरील पिकअप झोनमध्ये शेड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पुणे विमानतळावर पावसामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ‘पिकअप झोन’मध्ये लोखंडी शेड उभारण्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनाने मंगळवारी दिली.

पुणे - पुणे विमानतळावर पावसामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ‘पिकअप झोन’मध्ये लोखंडी शेड उभारण्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनाने मंगळवारी दिली. 

शेड उभारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच मंजुरी दिली आहे. तसेच त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पार्किंग क्रमांक दोनमध्ये शेड उभारणार आहे. पिकअप झोनमध्ये कॅबसाठी जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते. तेथे शेड उभारण्याचे काम दोन दिवसांत सुरू होईल आणि पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली. 

पिकअप झोनमध्ये कॅब पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते. परंतु तेथे कोणतीही शेड नाही. त्यामुळे पावसात उभे राहून प्रवाशांना कॅबची वाट पाहावी लागते. सलग दोन-तीन विमाने एकाचवेळी आल्यानंतर पिकअप झोनमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे तेथे तातडीने शेड उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

याबाबत प्रवासी कृष्णा जगताप म्हणाले, ‘‘तीन जुलै रोजी मी दिल्लीवरून पुण्यात आलो. तेव्हा गाडीसाठी अर्धा तास पावसात उभे राहावे लागले. त्यामुळे माझ्या बॅगाही भिजल्या होत्या. पावसाळा गृहीत धरून शेड उभारण्याचे काम यापूर्वीच विमानतळ प्रशासनाने सुरू करायला पाहिजे होते. उशीर जरी झाला असला, तरी ते सुरू होत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Airport Shade in Pickup zone