
Pune : आंबेगाव तालुक्यात चांडोली खुर्द येथे दोनबिबट्यांनी डरकाळी फोडताच ऊस कामगारांनी ठोकली धूम
मंचर : चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथील शेतकरी ज्ञानेश्वर चिमाजी इंदोरे यांच्या शेतात रविवारी (ता.५) दुपारी ऊस तोडणी सुरु असताना दोन बिबट्यांच्या डरकाळीचा आवाज आल्याने उसतोडणी कामगारांनी धूम ठोकली.
येथून पश्चिम दिशेला दोन किलोमीटर अंतरावर मंचर येथे जुन्या चांडोली रस्त्यावर रविवारी पहाटे दोन बिबटे सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाले आहेत. तब्बल तीन तास त्यांचा वावर होता. त्यामुळे चांडोली खुर्द व मंचर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंचर व चांडोली खुर्द परिसरात गेली दोन महिने अनेकांना बिबट्यांचे दिवसा व रात्री दर्शन झाले आहे.मेंढपाळांच्या सात मेंढ्या, अनेक कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. चांडोली रस्त्याने स्नेहा नवनाथ थोरात (वय २७ रा.चांडोली बुद्रुक) या दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. चांडोली परिसरातून दोन बिबटे दीड महिन्यापूर्वी जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले होते.पण या भागात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याने शेती कामांवर मोठा परिणाम झाला आहे.
जुन्या चांडोली रस्त्यालगत श्रीकृष्ण फर्निचरचे मालक धनश्री राहुल थोरात, राहुल थोरात व माजी सैनिक रवींद्र थोरात राहतात.त्यांना रविवारी मध्यरात्री कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला.त्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्याहून खिडकीतून पाहिले असता दोन बिबटे दिसले. त्यांनी ताबडतोब मोबाईलद्वारे संपर्क साधून आजूबाजूच्या लोकांना सतर्क राहण्याविषयी कळविले.
त्यांच्या सीसीटीव्हीत कँमेऱ्यात एक वाजून ३८ मिनिटे ते पहाटे चार वाजून १८ मिनिटे या कालावधीत दोन बिबटे कैद झाले आहेत. येथून दोन किलोमीटर अंतरावर पूर्वेला ज्ञानेश्वर इंदोरे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना प्रथम गुरगुरण्याचा व नंतर डरकाळ्या फोडण्याचा आवाज आला.
दोन बिबट्यान पाहून आठ ते दहा महिला पुरुष कामगारांनी तेथून पळ काढला.आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपतराव इंदोरे यांनी ही घटना मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व वनपाल संभाजीराव गायकवाड यांना कळविली. पिंजरे लावण्याची मागणी केली. तातडीने वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
“नर व मादी असे दोन बिबटे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ऊसतोडणी थांबविली आहे.बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. वनकर्मचारी रात्री गस्त घालून जनजागृती करणार आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे.”
स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर