पुण्यात आणखी आठ हजार खाटांची गरज

ज्ञानेश सावंत
रविवार, 12 जुलै 2020

शहरात कोरोनाचा उद्रेक आणखी वाढणार असल्याने पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील १०-१२ दिवसांमध्ये तब्बल आठ हजार खाटांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने नव्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी नव्याने पाच हजार खाटांची सोय महापालिकेने केली असून, पुढील चार दिवसांत आणखी तीन हजार खाटांची जागा निश्‍चित होईल. शिवाजीनगर, हडपसर, विमाननगरमधील ‘एसआरए’च्या इमारती, मैदानांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत.

पुणे - शहरात कोरोनाचा उद्रेक आणखी वाढणार असल्याने पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील १०-१२ दिवसांमध्ये तब्बल आठ हजार खाटांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने नव्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी नव्याने पाच हजार खाटांची सोय महापालिकेने केली असून, पुढील चार दिवसांत आणखी तीन हजार खाटांची जागा निश्‍चित होईल. शिवाजीनगर, हडपसर, विमाननगरमधील ‘एसआरए’च्या इमारती, मैदानांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून काही दिवसांपासून रोज साडेआठशे ते हजारापर्यंत नवे रुग्ण सापडत आहेत. त्याचवेळी कोरोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. तरीही महापालिकेसह खासगी हॉस्पिटलमध्ये खाटा मिळत नसल्याच्या असंख्य रुग्णांच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या ५० विलगीकरण कक्षांसह १३ कोविड केअर सेंटरमध्ये जागा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची मागणीही वाढत आहे. या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा अपुरी ठरत असल्याने नव्याने राज्य सरकारच्या इमारती, महापालिकेच्या जागा, शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे ताब्यात घेऊन तेथे विलगीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना ‘होम आयसोलेशन’ची सुविधा आहे; तरीही इतक्‍या प्रमाणात खाटांची आवश्‍यकता असल्याने चिंता वाढली आहे.

३००० ते ३५०० खाटा सरकारी, खासगी आणि संस्थांची वसतिगृहे
एकाच ठिकाणी तीनशेंहून अधिक खाटांची सोय होईल, अशा जागा निवडल्या आहेत. विशेषत: मैदानेही प्राधान्याने ताब्यात घेत आहोत. आरोग्य खात्याच्या मागणीनुसार सुविधा असलेल्या जागांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. पुढील चार दिवसांत पाच हजार खाटांची सोय होईल.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका 

नागरिकांचा ‘स्वॅब’ घेण्याचे प्रमाण चारपट वाढले आहे. त्याप्रमाणात रुग्ण संख्या आहे. त्यातून कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षात रुग्ण दाखल होत आहेत. नवे रुग्ण वाढण्याची शक्‍यता असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करीत आहोत. त्यामुळे शक्‍य तेवढ्या रुग्णांना सेवा देता येईल. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Another 8000 beds are needed