पुण्याचा विकास आराखडा मंजूर - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

वडगाव शेरी - ""पुण्याचा रखडलेला विकास आराखडा राज्य सरकारने आज मंजूर केला असून, छाननी समितीने केलेल्या सर्व शिफारसी मान्य करण्यात आल्या आहेत. शहराच्या पेठांतील रस्ता रुंदीकरण रद्द करण्यात आले असून, मेट्रोसाठी झोनही कायम करण्यात आला आहे. तसेच, पुनर्विकासाच्या धोरणामुळे पेठांना संरक्षण मिळणार आहे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

वडगाव शेरीतील राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, सुनीता गलांडे, संतोष राजगुरू आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ""आराखड्यातील 937 पैकी 850 आरक्षणे कायम राहणार आहेत. आघाडी सरकारमुळे रखडलेला विकास आराखडा आम्ही मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याने पुण्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसावाल्यांना चाप बसला आहे. लोकांना रांगेत उभे राहण्याची वेळ कॉंग्रेसमुळे आली. नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याची पावती नगरपालिका निवडणुकीत आम्हाला मिळाली, त्यामुळे भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत.'' 

""आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला होत असल्याने पुण्याच्या विकासाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल. पुण्याचे नाव जगातील उत्तम शहरात घेतले जाईल. यासाठी लवकरात लवकर विमानतळाच्या कामाला आम्ही सुरवात करणार आहोत,'' असेही त्यांनी सांगितले. 

मुळीक म्हणाले, ""वडगाव शेरीत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यापूर्वीचे आमदार गरिबांना त्रास देत होते. त्यांच्याकडून विविध कारणांसाठी धमकावून पंचवीस- पन्नास हजारांच्या पावत्या फाडत होते. ही दादागिरी आज संपली आहे.'' 

इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन होणार असल्याने आगामी पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे उद्‌घाटन कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. या शक्तिप्रदर्शनामुळे वडगाव शेरी परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती. 

संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, ""निवडणुका जवळ आल्याने जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असले उद्योग केले जात आहेत. असे करणाऱ्यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समजलेले नाहीत. त्यामुळे पुतळा विटंबना करणाऱ्यांचा मास्टर माइंड शोधून काढला जाईल. आमचे राज्य हे जातीयवादी नसून सर्व जाती-धर्मांचे आहे. शिवाजी महाराजांना अपेक्षित सुराज्य आम्ही घडवणार आहोत.''

Web Title: Pune approved development plan -CM