पुणे: साऊंड सिस्टिम बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे :  हळदीच्या कार्यक्रमासाठी मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवलेले साऊंड स्पिकर बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. 

तन्वीर शेख (वय 46, रा.सुरती मोहल्ला, खडकी), सिद्धराम तिपन्ना यळसंगी (वय 30, रा. दर्गा वसाहत, खडकी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शैलेश गायकवाड (रा. सुरती मोहल्ला खडकी) हा फरारी आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस.बी.भोसले यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळे टॉवर्स येथील पाण्याच्या टाकीजवळ लग्नासाठी हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपर्यंत साऊंड स्पिकर सुरू होते. याबाबत पोलिस नियंत्रण कक्षामधून खडकी पोलिसांना खबर मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक एस. बी. भोसले हे त्यांच्या स्टाफसमवेत संबंधीत ठिकाणी गेले. त्यांनी साऊंड स्पिकर बंद करण्यास सांगितले. त्यावेळी गायकवाड, शेख व यळसंगी यांनी पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचारी म्हस्के यांना अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच बीटमार्शलच्या दुचाकीची चावी काढून घेत गोंधळ घातला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एच. एस. ठाकूर करत आहेत. 

Web Title: Pune: Asking to close the sound system Police abducted