Pune : सहायक उप निरीक्षकाला धक्काबूक्की, दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Pune : सहायक उप निरीक्षकाला धक्काबूक्की, दोघांवर गुन्हा

दौंड : दौंड शहरात मध्यरात्री दोन वाजता डीजे वर गाणी लावून हुल्लडबाजी करणार्यांना डीजे बंद करण्यास सांगण्यास गेलेल्या पोलिस पथकाला धक्काबुक्की करण्यात आली आहे. दोघांविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड शहरात २ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता हा प्रकार घडला. दौंड - सिध्दटेक अष्टविनायक मार्गावर छत्रपती संभाजी स्तंभासमोर डीजे वर कर्कश आवाजात गाणी लावून हुल्लडबाजी करीत नाचत होते. आवाजाने त्रस्त नागरिकांच्या तक्रारीनंतर रात्र गस्त पथकाला तेथे पाठविण्यात आले होते. पोलिस पथकाने डीजे बंद करण्यास सांगितले असता आनंद अण्णाराव जाधव व अनोक शाम जाधव (दोघे रा. गोवा गल्ली, दौंड) यांनी पथकासमवेत हुज्जत घातली. डीजेचा आवाज बंद करण्यास नकार देत त्यांनी गोंधळ घातला. डीजे बंद करण्याऐवजी त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत मोठमोठ्याने आरडाओरडा केला.

दौंड पोलिस ठाण्यात सहायक उप निरीक्षक सुरेश दत्तात्रेय चौधरी यांच्या फिर्यादीनुसार आनंद अण्णाराव जाधव व अनोक शाम जाधव यांच्याविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३५३ ( लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला किंवा बळाचा वापर करणे), ३३२ ( लोकसेवकांना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचविणे ), ३४ (समान उद्देश्य साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली गुन्हेगारी कृती) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही संशयित आरोपी फरार असून दौंड पोलिसांनी डीजे चालकावर कारवाई टाळली आहे. संशयित आरोपी आनंद जाधव याच्याविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात यापूर्वी दोन फौजदारी गुन्हे दाखल आहेत.