देशातील १३५ अधिकाऱ्यांनी गिरवले भूजल संवर्धनाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atal Bhujal Yojana

केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अटल भूजल राष्ट्रीय कार्यशाळेत देशातील सात राज्यांमधील १३५ अधिकाऱ्यांनी भूजल संवर्धनाचे धडे गिरविले.

Atal Bhujal Yojana : देशातील १३५ अधिकाऱ्यांनी गिरवले भूजल संवर्धनाचे धडे

पुणे - केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अटल भूजल राष्ट्रीय कार्यशाळेत देशातील सात राज्यांमधील १३५ अधिकाऱ्यांनी भूजल संवर्धनाचे धडे गिरविले. या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाना या सात राज्यांतील अधिकारी सहभागी झाले होते.

राज्याचा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग आणि राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. सुजित सिन्हा यांच्या हस्ते सात नद्यांचे जलपूजन करत या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भूजल यंत्रणा विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे, डॉ. व्ही.एन. भावे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीकेश गोसकी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत अटल भूजल योजनेशी संबंधित असलेले अधिकारी व विषय तज्ञ सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत भूजल उपसंचालक डॉ.चंद्रकांत भोयर यांनी भूजल व्यवस्थापनामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे योगदान, या विभागामार्फत आतापर्यंत राबविण्यात आलेले प्रकल्प व नियोजित प्रकल्प या विषयावर मार्गदर्शन माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महाराष्ट्रातील निढळ या दुष्काळी गावाचे प्रगतशील गावात कसे परिवर्तन झाले, याची यशोगाथा सांगितली. पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी शाश्वत शेतीसाठी लोक चळवळ या विषयावर मार्गदर्शन केले. पानी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली लोकचळवळीबाबत सांगितले.

जैन इरिगेशनचे अधिकारी सोमनाथ जाधव यांनी विविध तंत्रज्ञानाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म सिंचन पद्धत व महत्त्व यावरील कंपनीद्वारे विकसित प्रॉडक्ट्सची माहिती दिली. यावेळी अजित फडणीस, अरुण देशमुख, उमा आसलेकर आणि तरंग पटेल यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार व राळेगणसिद्धी येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मग्गीरवार याही उपस्थित होत्या. सहायक भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांनी सूत्रसंचालन केले.