जगातील उद्योगांना आहे पुण्याचे आकर्षण - श्रीकांत अत्रे

सेनापती बापट रस्ता - ‘कोनिचीवा पुणे’ महोत्सवात श्रीकांत अत्रे (डावीकडून पाचवे) यांच्यासह जपान व भारतातील प्रतिनिधी.
सेनापती बापट रस्ता - ‘कोनिचीवा पुणे’ महोत्सवात श्रीकांत अत्रे (डावीकडून पाचवे) यांच्यासह जपान व भारतातील प्रतिनिधी.

पुणे - देशातील जपानी कंपन्यांची अर्ध्याहून अधिक कार्यालये आणि कंपन्या महाराष्ट्रात आहेत. दर्जेदार शैक्षणिक संस्था आणि संसाधन पुणे शहरात उपलब्ध असून, शहरातील विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाबरोबरच परदेशी भाषाही शिकत आहेत. त्यामुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ असलेल्या पुण्यात जगातील उद्योगांना आकर्षित करण्याची ताकद आहे, असे मत इंडो-जपान बिझनेस कौन्सिलचे (आयजेबीसी) अध्यक्ष श्रीकांत अत्रे यांनी व्यक्त केले.

‘आयजेबीसी’ आयोजित ‘कोनिचीवा पुणे’ या तीन दिवसीय औद्योगिक महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सेनापती बापट रस्ता येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूत मिचिओ हरादा, जपान नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशनचे कार्यकारी संचालक युसुके यामामाटो, जपान एक्‍स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशनचे महासंचालक मुनेनोरी मात्सुगाना, एमआयटी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. परशुरामन, ‘आयजेबीसी’चे माजी अध्यक्ष यशवंत घारपुरे आदी उपस्थित होते. 

‘‘पुणे हे जपानी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र बनले असून, उत्तम दर्जाचे विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत,’’ असे मत अत्रे यांनी व्यक्त केले.

हारादा म्हणाले, ‘‘आम्ही भारत आणि जपान दरम्यान आयटी, उत्पादन, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांत गुंतवणूक आणि व्यापार करण्यासाठी उत्सुक आहोत. जपानमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार उपलब्ध करून देत आहोत.’’ 

यामामाटो म्हणाले, ‘‘मागील वर्षी जपानला भेट देणाऱ्यांची संख्या दीड लाख होती. जपानी नागरिकही भारतात भेटी देत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील दीर्घकालीन आणि मजबूत संबंधांमध्ये वाढ झाली आहे.’’ 

‘कोनिचीवा पुणे’ या उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, पुणे आणि जपानमधील सांस्कृतिक आणि व्यावसायिक सौहार्द वाढविण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com