
व्यवसायात तोटा झाल्यामुळे पत्नी, मुलाचा खून करून आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, त्याने दोन मित्रांकडून ३० लाख रुपये उधार घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
Pune Crime : औंधमधील ते हत्याकांड व्यवसायात तोटा झाल्यामुळे
पुणे - व्यवसायात तोटा झाल्यामुळे पत्नी, मुलाचा खून करून आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, त्याने दोन मित्रांकडून ३० लाख रुपये उधार घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
औंध परिसरात बुधवारी एका आयटी अभियंत्याने पत्नी आणि निरागस मुलाचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत सुदिप्तो चंद्रशेखर गांगुली (४४), प्रियांका सुदिप्तो गांगुली (४०) आणि तनिष्क सुदिप्तो गांगुली (८) यांचा मृत्यू झाला होता. सुदिप्तो हा एका कंपनीत आयटी अभियंता होता. त्याने आठ महिन्यांपूर्वी नोकरी सोडून ऑनलाइन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. सुदिप्तो याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या गुन्ह्याचा तपास चतु:शृंगी पोलिस करीत आहेत.
पोलिसांना बुधवारी दुपारी एका खोलीमध्ये आई आणि मुलाचा तर, दुसऱ्या खोलीत सुदिप्तो यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सुदिप्तोची पत्नी आणि मुलाचा चेहरा प्लॅस्टिकच्या रॅपरने बांधलेला होता.
सुदिप्तोने पत्नी आणि मुलाला झोपण्यापूर्वी गुंगीचे औषध दिले असावे. तसेच, चेहऱ्याला रॅपर बांधल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मात्र, त्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण यांनी सांगितले.