
Pune : बारामतीच्या मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूही सहभागी होणार
बारामती : येथील शरयू फाऊंडेशन व बारामती रनर्स यांच्या वतीने रविवारी (ता. 19) बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विक्रमी नावनोंदणी झाली असल्याची माहिती शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी दिली.
ही स्पर्धा 21 व 10 कि.मी. अशा दोन प्रकारात होणार आहे. ज्यांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे अशा बारामतीकरांसाठी तीन कि.मी. अंतराचीही एक फन मॅरेथॉनही होणार आहे. या फनरनसाठीही एक हजारावर बारामतीकरांनी नावनोंदणी केलेली आहे.
दरम्यान या मॅरेथॉनसाठी 1300 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून त्यात काही परदेशी धावपटूही सहभागी होणार आहेत. या शिवाय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजराथ या राज्यातूनही स्पर्धक सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी सहभाग निश्चित केलेला आहे. ही स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरु होणार असून पेन्सिल चौकामार्गे कटफळ रेल्वे स्टेशन पासून पुन्हा म.ए.सो. विद्यालय अशा मार्गाने होणार आहे. समारोप म.ए.सो. विद्यालय येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांनी सन्मानित केले जाणार आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ होणार असून भारताची सुवर्णकन्या सुधा सिंह, कविता राऊत, ललिता बाबर या आंतरराष्ट्रीय धावपटू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी शरयू फाऊंडेशन व बारामती रनर्स यांनी जय्यत तयारी केली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासह स्पर्धा पाहून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बारामतीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शर्मिला पवार यांनी केले आहे.