शर्मिला ठाकरेंनी सुनेत्रा पवारांचे केले तोंड भरून कौतुक

सुनेत्रा पवार आणि शर्मिला ठाकरे
सुनेत्रा पवार आणि शर्मिला ठाकरे

बारामती : राज्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे पवार व ठाकरे कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध नवनव्या अंगाने पुढे येताना पाहिले गेले. याच मैत्रीचा एक नवीन आयाम नुकताच पुढे आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावरील 'दीपज्योती... एक प्रकाशपर्व' या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांच्या समवेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती अनेकांना सुखद धक्का देणारी अशीच होती. शर्मिला ठाकरे यांनी केवळ या कार्यक्रमाला उपस्थितीच लावली नाही, तर मनोगतात सुनेत्रा पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत त्या दोघींमधील मैत्रीचीही माहिती जाहीरपणाने दिली.

राज्याच्या राजकारणात अजित पवार व राज ठाकरे ही दोन्ही व्यक्तिमत्वे कमालीची लोकप्रिय. आपल्या खास शैलीतील भाषणांमुळे हे दोघेही सातत्याने चर्चेत असतात. एकमेकांची नक्कल करण्यापासून ते एकमेकांवर सडकून टीका करताना मागे पुढे न पाहणा-या या दोघांच्या पत्नींनी मात्र मैत्रीचा धागा जपल्याचे या कार्यक्रमातून पुढे आले. ज्येष्ठ नेते शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे उदाहरण नेहमी दिले जाते, मात्र पवार व ठाकरे कुटुंबातील पुढील पिढीनेही ही मैत्री कायम जपल्याचेच या निमित्ताने दिसले.

पुण्यातील अँड मिरॅकल या संस्थेचे विशाल हिरेमठ व त्यांच्या सहका-यांनी सुनेत्रा पवार यांच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रकाशित केले होते. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. या वेळी निमंत्रण पत्रिकेत शर्मिला ठाकरे यांचा नामोल्लेख नव्हता, मात्र व्यासपीठावर जेव्हा मान्यवरांचे आगमन झाले व सूत्रसंचालकांनी शर्मिला ठाकरे यांचा उल्लेख केला तेव्हा प्रचंड टाळ्या पडल्या. त्यांना या वेळी बोलण्यासही सांगितले गेले. भाषणाची सुरवातच मला माझ्या नव-यासारख छान बोलता येत नाही अशी प्रांजळ कबूली देतच त्यांनी केली.

सुनेत्रा पवार माझी मैत्रीण आहे आणि मुंबईत आम्ही वरचेवर भेटत असतो, खरतर ती अस काही काम करत असेल याची मलाही कल्पना नव्हती. काका (शरद पवार) आणि दादा (अजित पवार) आहेत म्हटल्यावर हिला काही करण्याची गरज आहे अस मला वाटलच नव्हत, पण ध्वनीचित्रफित पाहिल्यानंतर मलाही आता बारामतीला जाऊन तिचे काम पाहण्याची मनापासूनची इच्छा आहे. आम्हा सर्व मैत्रीणींना सुनेत्रा हिने बारामतीला घेऊन जावे, अशी इच्छा शर्मिला ठाकरे यांनी बोलून दाखविली. मुंबईतही पर्यावरणाची समस्या आ वासून उभी आहे, सुनेत्रा पवार यांनी मुंबईत जर हे काम सुरु केले तर पक्षीय भेद बाजूला सारुन मी त्यांच्यासमवेत उभी असेन अशी ग्वाही द्यायला शर्मिला ठाकरे विसरल्या नाहीत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार व ठाकरे कुटुंबातील मैत्रीपूर्ण संबंध किती दृढ आहेत याचीच प्रचिती आल्याची चर्चा कार्यक्रमानंतर होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com