esakal | Pune : ब्यूटी पार्लर व्यवसायाला घरघर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : ब्यूटी पार्लर व्यवसायाला घरघर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट : शाळा बंदमुळे मुले घरीच असल्याने पार्लरला वेळ मिळेना ,अन्य दुकानांना परवानगी मग ब्युटी पार्लरलाच का नाही , व्यवसायच नाही तर घरभाडे भरायचे कुठून, लॅाकडाउनमुळे भरलेला माल न वापरल्याने फेकून द्यावा लागला. व्यवसायच नसल्याने घेतलेले कर्ज न फिटल्याने मानसिक तणाव आलाय.. वेळ अपुरा आहे .. या आणि अशाच सुमारे पन्नासहून अधिक समस्यांचा पाऊसच ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलांनी पाडला.

ब्युटीपार्लर व्यवसायात निर्माण झालेल्या समस्या आणि आव्हाने जाणून घेण्याचा उद्देशाने आणि त्या प्रशासनासमोर मांडण्याचा हेतूने पिरंगुट (ता.मुळशी) येथील सनशाईन गृहनिर्माण संस्थेच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले होते.

त्यावेळी महिलांनी समस्या मांडल्या. सकाळने बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय चालविणाऱ्या महिला व्यावसायिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कोरोना काळात या महिलांना आपल्या व्यवसाय करताना अधिक संघर्ष आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने लावलेले निर्बंध आणि ग्राहकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था व्यावसायिकांना मारक ठरत आहे.

हेही वाचा: Pune : कोरोनामुक्तीनंतर केस गळण्याचे संकट

यावेळी रिहे येथील नव्याने ब्युटी पार्लर सुरू केलेल्या महिलेला आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थित महिलांचीही मने हेलावली आणि काही काळ वातावरण गंभीर बनले. चर्चासत्रास सकाळच्या सर्क्युलेशन इव्हेंटचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष कुडले तसेच शिवसेनेच्या जिल्हा संघटिका संगीता पवळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुळशी पंचायत समितीच्या महिला बचत गटाचे व्यवस्थापक अमोल पटेकर, ब्युटी स्कीन अँड हेअर तज्ज्ञ स्मिता देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी लवळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैशाली सातव, राणी आल्हाट, पिरंगुटच्या माजी सरपंच सुरेखा पवळे तसेच तालुक्यातील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

महिलांची ताकद विखुरलेली आहे. शासन अनुदान अथवा कमी व्याजदराने बॅंक कर्ज मिळविण्यासाठी महिलांना बचत गटाची आवश्यकता आहे. त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावेत जेणेकरून पतपुरवठा करणेही सुलभ होईल आणि व्यवसायांना गती मिळेल. त्यातून महिलांचे सक्षमीकरण होईल.

- अमोल पटेकर,

व्यवस्थापक, महिला बचत गट

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. त्यासाठी बचत गट तसेच वैयक्तिक पातळीवर विविध व्यवसाय उभारणे गरजेचे आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून महिलांच्या व्यवसायांना येणाऱ्या समस्या प्रशासन स्तरावर मांडाव्यात आणि महिलांचे सक्षमीकरण व्हावे.

- संगीता पवळे

ब्यूटी पार्लर व्यवसायावर शासनाने शैक्षणिक कर्ज दिले पाहिजे. लॉकडाउनमुळे व्यवसायच झाला नाही तर सहा महिन्यांचे स्टेटमेंट द्यायचे कुठून. मॉरगेज देऊनही स्टेटमेंट मागतात. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना जास्त समस्या आहेत.

- स्मिता देशपांडे

loading image
go to top