video : भिडे पूल पाण्याखाली; शहरात वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाणी सोडल्याने मंगळवारी डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला.

पुणे - खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाणी सोडल्याने मंगळवारी डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक शाखेने सुरक्षेसाठी पुलावरील वाहतूक बंद केली. पोलिसांनी वाहतूक वळविल्याने मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मंगळवारी दिवसभर व रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.

खडकवासला धरण प्रकल्पामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री खडकवासला धरण पूर्ण भरले. त्यामुळे प्रशासनाने १४ हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतूक शाखेने सकाळी साडेदहा वाजल्यापासून डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला. या पुलावर दुपारी दीड वाजल्यानंतर पाणी वाहू लागले.

दरम्यान, भिडे पुलावरून येणारी वाहतूक वळविल्याने शहरामध्ये सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. नारायण पेठेकडे येणारी व कोथरूड, डेक्कनच्या दिशेने जाणारी वाहतूक पोलिसांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन मार्गे कर्वे रस्ता, टिळक चौक मार्गे लाल बहादूर शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता या मार्गावर वळविली. दरम्यान, सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्याचा दुचाकीस्वारांना त्रास झाला. तसेच महापालिकेजवळील टिळक पूल ते भिडे पुलापर्यंतच्या भागातील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या चारचाकी केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरून धावल्या. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर दिवसभर व रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली, कामावरून सुटल्यानंतर पुणेकर या वाहतूक कोंडीत अडकले, त्यामध्ये त्यांचा एक ते दोन तास वेळ वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी गेला, त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.

काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तास गेला
भिडे पुलावरील वाहतूक बंद केल्याने झालेल्या कोंडीमध्ये वाहनचालकांचा बराच वेळ गेला. वाहतूक संथ झाल्याने तब्बल एक ते दीड तास इतका वेळ नागरिकांना काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी गेला. त्यामुळे ते संतप्त झाले. नागरिकांनी भिडे पुलाऐवजी पर्यायी मार्गाने जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Bhide Bridge Underwater