Pune : वीट भट्टी व्यावसायिक आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीट भट्टी

Pune : वीट भट्टी व्यावसायिक आर्थिक संकटात

पारगाव : बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे मातीच्या विटांना उठाव नसल्याने विटांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सहा महिन्यापूर्वी एक हजार विटांना १५ हजार रुपयांचा मिळणारा दर आता ११ हजार रुपयांवर येऊन सुध्दा विटांना मागणी नाही. त्यात उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाल्याने वीट भट्टी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहे.

मागील पाच ते सहा वर्षापूर्वी बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस असल्याने बांधकाम साहित्याच्या व्यवसायालाही चांगले दिवस आले होते. त्यामुळे मातीच्या विटांनाहि चांगली मागणी होती. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेकांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरु केला. मागील दोन वर्षात विटांना चांगली मागणी वाढली त्यामुळे विटांचे प्रती हजारी दर हे १५ हजार रुपयांवर गेले.

त्यामुळे व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू लागल्याने व्यावसायिकांनी विटांचे उत्पादन वाढवले त्यातच कोरोनाचे संकट आले त्यानंतर बाजारात मंदी आली बांधकामे थंडावली, यावर्षी पावसाळ्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांना याचा मोठा फटका बसला त्यामुळे ग्रामीण भागात यावर्षी नवीन बांधकामे सुरु झाली नाही.

अलीकडच्या काही वर्षात मातीच्या विटांना सिमेंट तसेच सेपोरेक्स विटांचा पर्याय उपलब्ध झाला. सिमेंटची एक वीट ८ ते ९ रुपयांना मिळते मातीच्या विटेच्या तुलनेने ती स्वस्त मिळत आहे, सेपोरेक्स विटांचे दर जेमतेम मातीच्या विटांन सारखेच असले तरी त्या विटांचा वापर केल्यास बांधकाम व प्लास्टर साठी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होती, सेपोरेक्स विटा वजनात हलक्या असल्याने बांधकामासाठी वापरण्यात येणारे स्टील हे कमी लागते म्हणजे त्यामध्ये सुमारे ३० टक्क्याने बचत होती त्यामुळे सेपोरेक्स विटांचा वापर वाढला आहे.त्याचाही परिणाम मातीच्या विटांच्या विक्रीवर झाला.

शिवराज पोखरकर, वीटभट्टी व्यावसायिक , संतोषनगर (भाम) ता. खेड विटांचे दर उतरले असले तरी उत्पादन खर्च कमी झालेला नाही तो वाढलेलाच आहे. माती २५०० ते ३००० रुपये ब्रास ने मिळत आहे, कोळशाचा प्रती टनाचा दर १२ हजार ५०० ते १३ हजार रुपयांवर गेला आहे, काळी राख पाच हजार ५०० रुपये टन, पांढरी राख १४०० ते १५०० रुपये टन, बगॅस २४०० रुपये टन, मजुरी व वहातुक एक हजार विटांसाठी सरासरी १६०० ते १७०० रुपये येत आहे त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे

एक विटेसाठी १० रुपये उत्पादन खर्च येत आहे ती वीट ११ रुपयांना विकूनही उठाव नाही सहा महिन्यापूर्वी उत्पादन खर्च तेवढाच होता परंतु एक वीट १५ रुपयांना जात होती. दर वर्षी दसऱ्याला वीट भट्टी व्यवसायाला सुरुवात होते त्यावेळी भट्टीवरील मागील वर्षीच्या सर्व विटांची विक्री झालेली असते परंतु यावर्षी सरासरी प्रत्येक वीटभट्टीवर दसऱ्याला मागील हंगामातील ५० टक्क्याहून जास्त विटा शिल्लक होत्या.

ज्ञानेश्वर दरेकर, वीटभट्टी व्यावसायिक , धामणी ता. आंबेगाव

वीटभट्टी व्यवसायासाठी लागणारे कामगार हे बहुतांशी यवतमाळ, मध्यप्रदेश येथून लाख लाख रुपये उचल देऊन वाहनांची व्यवस्था करून आणावे लागतात. त्यातच मातीला व माती वाहतुकीला परवाने मिळण्यास येणारी अडचण त्यामुळे वीटभट्टी व्यवसायिक मंदी त्यात उत्पादन खर्च वाढलेला या दुहेरी संकटात सापडला आहे.