पुण्यात ‘बीआरटी’ सुसाट

BRT
BRT

पुणे - सातारा रस्त्यावर बीआरटी सुरू झाल्यावर अवघ्या सात दिवसांत या मार्गांवरील प्रवासी संख्येत सुमारे ५६ हजारांनी वाढ झाली आहे. तसेच पीएमपीच्या तिजोरीतही प्रतिदिन सुमारे चार लाख रुपयांची वाढ झाली आहे. स्वारगेट-कात्रज अंतर अवघ्या १३-१५ मिनिटांत पार होत असल्यामुळे प्रवासीही सध्या सुखावले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात कात्रज-स्वारगेट दरम्यानची बस वाहतूक ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली. बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे पहिल्या दिवशी वाहनचालकांचा थोडा गोंधळ उडाला. परंतु, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे गेल्या चार दिवसांत दिसून आले. स्वारगेट-कात्रज हे अंतर पार करण्यासाठी यापूर्वी सुमारे अर्धा तास लागत होता. परंतु, हा कालावधी आता निम्म्यावर आला आहे. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढू लागली आहे. बीआरटी मार्गातील बसचे दरवाजे दोन्ही बाजूने उघडतात. बीआरटी स्थानकांवर लेव्हल बोर्डिंग होत असल्यामुळे प्रवासी सुरक्षितपणे चढ-उतार करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा बीआरटी मार्गातून वेगाने प्रवास होत असल्यामुळे प्रवासी बीआरटीला पसंत देऊ लागले आहेत. 

या मार्गातून प्रवास करून प्रवासी स्वारगेटला बस बदलून इच्छितस्थळी जात असल्याचा ट्रेंड वाढता असल्याचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी नमूद केले. थांब्यावर बस थांबल्यावर सुमारे ३० सेकंदात ८-१० प्रवासी चढ-उतार करीत. लेव्हल बोर्डिंगमुळे आता ३० सेकंदांत १५-२० प्रवासी चढ-उतार करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अशी आहे स्थिती
२ लाख १८ हजार - सातारा रस्त्यावरील पूर्वीची सरासरी प्रवासी संख्या
२ लाख २६ हजार - बीआरटी सुरू झाल्यावर रोजची सरासरी संख्या 
४ लाख रुपये - बीआरटी सुरू झाल्यावर उत्पन्नात झालेली रोजची वाढ

सातारा रस्ता बीआरटी मार्गावर प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रशासनालाही हुरूप आला आहे. आता पुढच्या टप्प्यात हडपसर बीआरटीवर प्रशासन लक्ष केंद्रित करणार असून, त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी हाच सक्षम पर्याय असून, जास्तीत जास्त बीआरटी मार्ग निर्माण होणे पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी गरजेचे आहे. 
- डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी

सातारा रस्त्यावर बीआरटी सुरू झाल्यावर प्रवासी वाढले आणि पर्यायाने उत्पन्नही वाढले, ही चांगली बाब आहे. पुण्यात बीआरटीचे जाळे वाढले तर, वाहतूक कोंडी कमी होईल आणि अनेक लोक खासगी वाहनांऐवजी पीएमपीच्या बसचा निश्चित वापर करतील. 
- हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट

नोकरीमुळे कात्रज-स्वारगेट दरम्यान मी रोज प्रवास करतो. बीआरटी सुरू झाल्यापासून बस आता १५ मिनिटांत स्वारगेटला पोचते. कोठेही ट्रॅफिक जॅम होत नाही. घरी जाताना पण नेहमीपेक्षा लवकर पोचतो. बसचीही संख्या वाढली असून त्यामुळे वाट पाहावी लागत नाही. ही व्यवस्था कायम राहिली तर, प्रवाशांसाठी खूप चांगले होईल. 
- संतोष दानवे (प्रवासी)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com