‘बीआरटी’च्या कामात विघ्न

‘बीआरटी’च्या कामात विघ्न

पुणे - ‘बीआरटी’च्या मार्गात वेगवेगळ्या कारणांमुळे विघ्न येऊ लागली आहेत. त्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते राजीव गांधी पुलादरम्यानचे ‘बीआरटी’चे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे बीआरटीचे थांबे हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिणामी ४० कोटी वाया जाण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौक ते औंधमधील राजीव गांधी पुलादरम्यान ‘बीआरटी’ मार्ग विकसित करून पिंपरी- चिंचवडमधील ‘बीआरटी’ मार्गाला जोडण्याचे महापालिकेचे नियोजन होते. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी कामही सुरू झाले. त्यासाठी ८० कोटींची तरतूद महापालिकेने केली. सिमला ऑफिस चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान बीआरटीचा प्रस्ताव असताना, हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रोचे काम बाणेरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे महापालिकेने सिमला ऑफिस चौक ते विद्यापीठदरम्यान बीआरटी उभारण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. त्यामुळे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पुलादरम्यान तीन किलोमीटरच्या रस्त्यावर ‘बीआरटी’चे काम सुरू झाले. परंतु वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे हे काम महापालिकेने थांबविले आहे. काम सुरू करताना पोलिसांनी परवानगी दिलेली असताना,आता आक्षेप घेतला आहे.

या रस्त्यावर बीआरटीसाठी सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. बीआरटी मार्गासाठी लेन उभारायचे काम फक्त बाकी आहे. परंतु पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग काढला जाईल. 
अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका

या पूर्वीच्या वाहतूक उपायुक्तांनी आक्षेप नोंदविण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहारावर वाहतूक पोलिस ठाम आहेत. महापालिकेने पुन्हा याबाबत विचारणा केली तर चर्चा करू; परंतु गेल्या तीन महिन्यांत त्यांनी काही विचारणा केलेली नाही. 
पंकज देशमुख, उपायुक्त,वाहतूक पोलिस 

या रस्त्यावर बीआरटीचे काम सुरू झाले असताना वाहतूक पोलिस ते कसे थांबवू शकतात? बीआरटीमुळे वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदतच होणार आहे. केवळ रस्ते मोठे करून प्रश्‍न सुटणार नाही, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. 
रणजित गाडगीळ, परिसर संस्था 

वाहतूक पोलिसांचा आक्षेप  
विद्यापीठ रस्त्यावर राजभवन आहे. तेथे वारंवार महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ होत असते. त्यामुळे या रस्त्यावर बीआरटी केल्यास त्यांना वळसा मारून यावे लागेल. तसेच हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे बाणेर रस्त्यावर काम सुरू होणार असल्यामुळे त्या वेळी या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढेल. त्यामुळे या रस्त्यावर बीआरटी नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com