Loksabha 2019 : राज्यमंत्री पास की नापास होणार 

Loksabha 2019 :  राज्यमंत्री पास की नापास होणार 

पुणे- कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहिल्यानंतर हा मतदारसंघ यंदा कोणाला साथ देणार, यावर आगामी विधानसभेचे गणित अवलंबून आहे. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दृष्टीने ही निवडणूक कसोटीची आहे. त्यात कांबळे "पास' की "नापास' होणार, याची लिटमस टेस्ट 23 मे रोजीच होणार आहे. 

शहराच्या मध्यवस्तीपासून ते उपनगरपर्यंत हा मतदारसंघ पसरला आहे. साठ टक्के झोपडपट्टीचा, तर चाळीस टक्के सोसायट्यांचा हा भाग. हा मतदारसंघ नेहमीच कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघाने साथ दिली. एवढेच नव्हे, तर महापालिका निवडणुकीतही भाजपला मोठे यश दिले. एकूण पाच प्रभागातील वीस नगरसेवकांपैकी 14 भाजपचे, तर सहा नगरसेवक कॉंग्रेसचे आहेत. पुणे कॅंटोन्मेंटमध्ये भाजपचे पाच सदस्य असून, दोन कॉंग्रेस आणि एक अपक्ष सदस्य आहे. पक्षीय बलाबल पाहता, सध्या तरी या मतदारसंघात भाजपची ताकद दिसते. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मतदारसंघात 51.06 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला अवघ्या 13 हजारांचे लीड मिळाले होते. मतदार यादी पुनर्रचनेमध्ये मतदारांची संख्या अवघ्या तेरा हजारने वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत अवघे 48.79 टक्के मतदान झाले. टक्केवारीत पाहिले, तर मतदानामध्ये 2.27 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. एकूण 1 लाख 40 हजार तीन एवढे मतदान झाले होते. या वेळी 1 लाख 40 हजार 283 एवढे मतदान झाले. त्यामुळे केवळ 280 मतांनी वाढ झाली आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे हे देखील याच मतदारसंघातील आहेत. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणतीही लाट नाही. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बागवे आणि कांबळे यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या मतदारसंघात पुन्हा कमळ फुलणार की पंजा येणार, या दृष्टीने पाहिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com