कॅन्टोन्मेंटला मिळणार नवी बांधकाम नियमावली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

नव्या बांधकाम नियमावलीमुळे कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), पार्किंग, रस्ता आणि बांधकाम यामध्ये किती फूट अंतर असावे, याची रूपरेषा निश्‍चित होणार आहे. त्या दृष्टीने नवीन नियमावलीसाठी नागरिकांना आपल्या सूचना मांडता येणार आहेत. 

पुणे : सध्याच्या चटई क्षेत्र निर्देशांकानंतर (एक्‍जिस्टिंग एफएसआय) संरक्षण मंत्रालयाने आता कॅन्टोन्मेंटसाठी नवीन बांधकाम नियमावली बनविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या नव्या नियमावलीत जादा "एफएसआय'सह जुन्या बांधकामांसंबंधीच्या प्रश्‍नांवरही तोडगा निघण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून केंद्र सरकारने सहा महिन्यांत प्रस्ताव मागविला आहे. 
केंद्र सरकारने देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी स्वतंत्र बांधकाम नियमावलीची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाने दिले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटने वर्षभरापूर्वी याच मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नव्या बांधकाम नियमावलीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंबंधी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. यादव यांनी सर्वसाधारण बैठकीत सदस्यांना माहिती दिली. या वेळी कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, बोर्डाचे सदस्य अशोक पवार, विनोद मथुरावाला, अतुल गायकवाड, विवेक यादव, डॉ. किरण मंत्री, प्रियांका श्रीगिरी, रूपाली बिडकर उपस्थित होत्या. 

यादव म्हणाले, ""पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागील वर्षी हा आराखडा तयार केला होता. त्यातील त्रुटी दूर करून तो मालमत्ता विभागास पाठविला होता. आता केंद्र सरकारच्या नियमावलीच्या आधारे नवीन बांधकाम आराखडा तयार करायचा आहे. त्यासाठी येत्या महिनाभरात कॅन्टोन्मेंटवासीयांच्या हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर या आराखड्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारच्या मंजुरीनंतर हा आराखडा प्रत्यक्षात कृतीत उतरणार आहे.'' 

कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या, त्यांची श्रेणी, सध्या उपलब्ध असलेला चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), बांधकामांची सद्यःस्थिती आणि नव्या नियमांमध्ये कोणकोणत्या तरतुदी असायला हव्यात, अशा असंख्य महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. नव्या आराखड्यासाठी कॅन्टोन्मेंटमधील अडचणी, सूचना व हरकती मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे हा बांधकामाचा नवीन आराखडा कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी अपेक्षा बोर्डाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. 

एकशे बहात्तर पानांचा प्रस्ताव 
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) तयार केली आहेत. ती मार्गदर्शक तत्त्वे देशातील कॅन्टोन्मेंटला पाठविण्यात आली आहेत. त्या तत्त्वांच्या आधारे कॅन्टोन्मेंट बोर्डाने बांधकाम नियमावली बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने हा प्रस्ताव तयार केला आहे. पूर्वी 35 पानांचा असलेला प्रस्ताव आता 172 पानांचा आहे. पूर्वीच्या नियमावलीत त्रुटी होत्या. त्यात स्पष्टता आणली आहे. आता या प्रस्तावावर येत्या महिनाभरात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर या प्रस्तावात आवश्‍यक बदल केले जातील. या प्रक्रियेनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला जाणार आहे. 

कॅन्टोन्मेंटवासीयांना दिलासा 
कॅन्टोन्मेंट कायद्यातील जाचक अटींमुळे कॅन्टोन्मेंटवासीयांना अनेक वर्षांपासून घरबांधणी, दुरुस्ती, हस्तांतरण, भाडेकरार नूतनीकरण यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत. या अडचणींची गांभीर्याने दखल घेत नवीन सरकारने सध्याच्या "एफएसआय'नुसारच्या बांधकामांना परवानगी देत कॅन्टोन्मेंटवासीयांना दिलासा दिला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटवासीयांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या. नव्या बांधकाम नियमावलीमुळे कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय), पार्किंग, रस्ता आणि बांधकाम यामध्ये किती फूट अंतर असावे, याची रूपरेषा निश्‍चित होणार आहे. त्या दृष्टीने नवीन नियमावलीसाठी नागरिकांना आपल्या सूचना मांडता येणार आहेत. 

Web Title: Pune Cantonment to get new Construction policy