
कामगारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून वारजे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime : मारहाणप्रकरणी माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह सहाजणांवर गुन्हा
पुणे - आमदार निधीतून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून वारजे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वासुदेव शिवाजी भोसले (वय ४५, रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. भोसले हे भाजपचे शहर सरचिटणीस आहेत. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आमदार भीमराव तापकीर यांच्या आमदार निधीतून वारजे येथील आरएमडी कॉलेज ते साई सयाजीनगरमधील भुयारी मार्गात मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी माजी नगरसेवक दोडके आणि त्यांचे पाच-सहा कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी भोसले यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच, कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
कात्रज-देहू रोड बाह्यवळण मार्गावरील उड्डाणपूल, परिसरातील विकासकामे आणि सुशोभीकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. विरोधकांनी राजकीय हेतूने माझ्याविरोधात खोटी तक्रार दिली आहे. विरोधकांनी विकासकामांबाबत स्पर्धा करावी. त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असून, तपासानंतर जनतेसमोर खरी बाजू समोर येईल.
- सचिन दोडके, माजी नगरसेवक