ऐश्‍वर्य आणि समृद्धीचे उत्साहामध्ये पूजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सायंकाळी मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे म्हणून सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी "लक्ष्मी', साळीच्या लाह्या, बत्तासे, आंब्याच्या डहाळ्या, झेंडूची फुले, ऊस, चिंच, बोरे, आवळा आणि काराटं यांसह अन्य फळांचे वाटे, नैवेद्याकरिता मिठाई खरेदीचाही आनंद अनेकांनी घेतला.

पुणे -  रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून आणि पणत्या उजळवून, तसेच आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईच्या माळांनी घरे, दुकाने, व्यापारी पेढ्या सजवून आश्‍विन वद्य अमावास्येच्या तिन्हीसांजेला नागरिकांनी उत्साहात लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला. लक्ष्मीसहित कुबेराच्या प्रतिमा, मूर्तींचेही पूजन केले. स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या "लक्ष्मी'ची पूजा करण्यात आली. आबालवृद्धांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

सायंकाळी मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे म्हणून सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी "लक्ष्मी', साळीच्या लाह्या, बत्तासे, आंब्याच्या डहाळ्या, झेंडूची फुले, ऊस, चिंच, बोरे, आवळा आणि काराटं यांसह अन्य फळांचे वाटे, नैवेद्याकरिता मिठाई खरेदीचाही आनंद अनेकांनी घेतला. बोहरी आळी येथे जमा-खर्चाच्या वह्या, रोजमेळ, खतावण्या खरेदीचाही मुहूर्त व्यापाऱ्यांनी साधला.

दरम्यान, उद्या (ता. 31) कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) आहे. व्यापारी वर्गात दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असते. पाडव्याला वहीपूजनाचा मुहूर्त यंदा सोमवारी मध्यरात्री एक वाजून 35 ते पहाटे चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजून 15 मिनिटांपर्यंत तसेच सकाळी नऊ वाजून 50 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपर्यंत, असे वहीपूजनाचे तीन मुहूर्त आहेत, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे.
 

Web Title: Pune celebrates Laxmi Pujan