#WaterCrisis ऐन सणासुदीत पाणीबाणी

#WaterCrisis ऐन सणासुदीत पाणीबाणी

पुणे - शहर आणि उपनगरांमध्ये नवरात्रातील पहिल्या माळेपासून सुरू झालेली ‘पाणीबाणी’ नवव्या दिवशी म्हणजे, मंगळवारीही कायम राहिली. आठवडाभर पाणीटंचाई ओढवल्याने दसऱ्याच्या तोंडावर सणासुदीच्या काळात लोकांची ओढाताण सुरू आहे. आधी ज्या भागांत तीन-साडेतीन तास पाणीपुरवठा होता, तिथे आज तासभरही पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. पाणी साठवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र शहरभर आहे. पाण्याच्या संकटामुळे पुणेकर संतप्त झाले आहेत.

पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा करणाऱ्या पालकमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांच्या डोळ्यांदेखतच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ लोकांवर आली; तरीही, पाणीपुरवठा सुरळीत करून पुणेकरांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पुण्याच्या कारभाऱ्यांनी आणि प्रशासनाने एकही पाऊल उचललेले नाही. महापालिका आणि जलसंपदा खात्यातील वादामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे भासविले असले तरी, ही पाणीकपात आहे का, हे महापालिका जाहीर करण्याचे धाडसही दाखवत नाही. त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार की नाही? याचे उत्तर तूर्तास तरी कोणाकडेही नाही. त्यामुळे दसऱ्यानंतर म्हणजे दिवाळीतही पुणेकरांना पाण्याची प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे तूर्तास दिसत आहेत. 

पाणीपुरवठा विस्कळित 
कोंढवा, मिठानगर, लुल्लानगर, शिवनेरीनगर, एनआयबीएम रस्ता आदी भागात पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. अनधिकृत बांधकामांची संख्या आणि त्याला देण्यात आलेल्या बेकायदा नळजोडांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा फटका अधिकृत बांधकाम असलेल्या घरांना बसत आहे. पाणीपुरवठा एक ते दीड तास होतो, तोही कमी दाबाने होत असल्याने पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. पाण्याची अतिरिक्त गरज भागविण्यासाठी नागरिकांना टॅंकर विकत घ्यावा लागतो.  

कमी पाण्याची उचल
शहरासाठी खडवासला धरणातून पूर्वीप्रमाणे १३५० एमएलडी पाणी देण्यात येत आहे, असा दावा जलसंपदा खात्याने दोनच दिवसांपूर्वी केला होता. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी घेतलेल्या पाण्याची आकडेवारी जाणून घेतल्यास वस्तुस्थित निराळी असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या तीन दिवसांत १३०० एमएलडीही पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे कालवा समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक आणि कपातीची घोषणाही महापालिकेने केलेली नाही. तेव्हा जलसंपदा खात्याने परस्पर पाणीसाठ्याला कात्री लावली आहे. त्यामुळे सणासुदीचे दिवस असूनही पाणीकपात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दसऱ्यानंतर दोन दिवसांत पाणीसाठ्यात आणखी कपात होण्याची भीती आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पुणेकरांना जपून पाणी वापरावे लागणार आहे. 

आम्ही मिळकत करासोबत पाणीपट्टी भरतोय; पण अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने टॅंकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत होती, तेव्हा टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. महापालिका हद्दीत येऊन वीस वर्षे उलटली तरी टॅंकरनेच पाणीपुरवठा होतोय.
- उस्मान शेख, मिठानगर

खडकवासलातून घेतलेले पाणी
 सोमवार (ता.१५)    १२७८ एमएलडी
 मंगळवार (ता.१६)    १२८७ एमएलडी
 बुधवार (ता.१७)    १२५७ एमएलडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com