Video : बापरे! केवढी ही गर्दी; दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात गर्दी उसळली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला महात्मा फुले मंडई, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता या भागात खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.

पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातील मुख्य बाजरपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे रविवारी (ता.८) पाहावयास मिळाले. तुळशीबाग, लक्ष्मी रोड, मंडई परिसरात नागरिकांची तुफान गर्दी दिसत असून सोशल डिस्टिसिंगच्या नियमांचे अजिबात पालन होताना दिसले नाही.

सध्या बाजारपेठांमधील तुडुंब गर्दी पाहता पुण्यात अजूनही कोरोना आहे, याचा विसर पुणेकरांना पडलेला दिसतोय. पुण्यात सध्या कोरोनाबाधितांची कमी होत असली तरी ही गर्दी पाहता कोराना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणेकरांनो, आता तरी सुधारा. गर्दी टाळा, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळान नाहीतर दंडाची पावती फाडायला तयार व्हा.

दरम्यान, गेल्या आठवड्यात खरेदीकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसल्याने व्यापारी वर्ग चिंतेत पडला होता. या आठवड्यात अनेकांचे पगार झाल्याने आणि हाती बोनसची रक्कम आल्याने अनेकांनी आज खरेदीसाठी गर्दी केली होती. आठवडाभरावर दिवाळीसण आल्याने बाजारपेठ फुलून गेली होती. 

पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला महात्मा फुले मंडई, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता या भागात खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. खास दिवाळीसाठी आकाशकंदील, पणत्या, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा भर होता. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न भेडसावत असल्याने अनेकांनी आपली वाहने जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क करणे पसंत केले होते. 

बाबूगेनू चौक, मंडई परिसरात पोलिस तैनात करण्यात आले होते. विनामास्क दिसणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत होती. तसेच एखाद्या ठिकाणी जास्त गर्दी होत असल्याचे दिसताच पोलिस तेथील गर्दी हटविण्याचे काम करताना दिसून आले. मास्क वापरण्याला आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबतही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले मात्र, याकडे अनेक पुणेकर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Citizens had flocked in large numbers for Diwali shopping