
Reels : पुणेकर खवय्यांची ‘रिल्स’ला पसंती
पुणे - विविध ठिकाणच्या पदार्थांची चव चाखण्यासाठी पुणेकर सज्जच असतात. कोणता पदार्थ कुठे चांगला मिळतो याचे सर्चिंग तर कायमच असते. सतत नवनवीन पदार्थ चाखण्यासाठी तत्पर असलेल्या खवय्यांना आता रिल्सच्या माध्यमातून हॉटेलिंगसाठी पर्याय उपलब्ध होत आहेत. अशा प्रकारचे रिल्स इन्स्टावर पाहायला मिळतात. त्यामुळे हॉटेलमधील वैविध्यता उलगडण्यास मदत होत आहे. या रिल्समुळे ग्राहकांची गर्दी वाढत असल्याची माहिती हॉटेल चालकांनी दिली.
पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची परंपरा कायम ठेवत विविध थीमवर आधारित अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि गल्लोगल्ली छोटी-मोठी हॉटेल्स सुरू झाली आहेत. जिभेला व पोटाला तृप्त करणारे आणि खिशाला परवडणारे अनेक पदार्थ अशा हॉटेलांत मिळतात. मात्र त्याची माहिती खवय्यांना होण्यासाठी वेळ जातो. याचा विचार करीत आता हॉटेलचालक रिल्सस्टारला हॉटेलमध्ये बोलावत तेथील खाद्यपदार्थांचे रिल्स करण्यास सांगत आहेत. त्यांचे रिल्स पाहून ग्राहकांची संख्या वाढत आहे.
रिल्सचा फायदा
विविध ठिकाणच्या हॉटेलमधील पदार्थांची माहिती होते
आपल्या बजेटमधील हॉटेल शोधण्यास सोपे
हॉटेलच्या ब्रँडिंगचा नवा मार्ग
इन्स्टास्टारच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्याची संधी
आमच्या हॉटेलचे अनेक रिल्स सोशल मीडियावर आहेत. ते पाहून जेवणासाठी आल्याचे अनेकांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यापासून हा ट्रेंड वाढला आहे.
- विजय जाधवर, हॉटेल व्यावसायिक
ब्लॉगरला उत्पन्नाचा स्रोत
विविध खाद्यपदार्थांचे ब्लॉग करणारे अनेक ब्लॉगर पुण्यात आले. शहरासह जिल्ह्यात कुठे चांगले पदार्थ मिळतात, याची माहिती ते त्यांच्या ब्लॉगमधून देत आहेत. दिवसातून दोन ते तीन रिल्स ते हमखास बनवत आहेत. त्यातून त्यांना उत्पन्न मिळत आहे.
आम्ही छंद म्हणून ब्लॉग सुरू केला. त्याचे व्यवसायात रूपांतर झाले. आपल्या घराजवळ चविष्ट, दर्जेदार पदार्थ मिळतात हे अनेकांना ब्लॉकच्या माध्यमातून समजले.
- सानिका पुराणिक, ओंकार मुंदडा, फूड ब्लॉगर.