Vidhan Sabha 2019 : पुण्यात निरुत्साह; जिल्ह्यात उत्स्फूर्त

bibwewadi-voter
bibwewadi-voter

विधानसभा 2019 

पुणे शहरात सरासरी ४८ टक्के, तर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान 
पुणे - वरुणराजाने दाखविलेल्या कृपेनंतरही पुणेकरांनी लोकसभेप्रमाणेच मतदानाकडे पाठ फिरवली, तर ग्रामीण भागातील मतदारांनी नेहमीचाच उत्साह कायम ठेवत मतदानाचा टक्का वाढविला. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) काही काळ बंद पडल्याच्या तक्रारी वगळता पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत मतदान शांततेत पार पडले. शहरात सरासरी ४८ टक्के, तर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान झाले. 

गेल्या तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस होत होता. सुदैवाने आज संपूर्ण दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने मतदानावर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही, त्यामुळे शहर व जिल्ह्यात सकाळी उत्साहात मतदार बाहेर पडले. दुपारनंतर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढत गेली. पुणे शहरात मात्र लोकसभा निवडणुकीपेक्षाही या वेळी जास्तीचा निरुत्साह आढळला. त्याचा फटका शहरातील आठही मतदारसंघांतील मतदानाचा टक्का घसरण्यावर झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शहरातील आठही मतदारसंघांत मतदानाचा टक्का सरासरी तीन ते चार टक्‍क्‍यांनी घसरला आहे. शहरातील आठ मतदारसंघांत सरासरी ४८ टक्के, तर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान झाल्याचे रात्री जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. 

सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. पावसाने उघडीप दिल्याने शहरातील अनेक मतदारांनी नेहमीप्रमाणे फिरायला जातानाच मतदान केले. सकाळी नऊनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. कोथरूड, कसबा पेठ, सिंहगड रस्ता, वानवडी, विमाननगर आदी सोसायट्यांच्या भागातील मतदारांनी सकाळी दहा ते दुपारी तीन या दरम्यान मतदान केले. तर, झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी दुपारी चारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लावल्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा ३६ टक्के, पुणे कॅंटोन्मेंट ३८, हडपसर ४८, पर्वती ४५, खडकवासला ४९, कोथरूड ४३, शिवाजीनगर ३९ टक्के, तर वडगावशेरी मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतरही शहर व जिल्ह्यातील शंभर मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते, ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहिले. त्यामुळे मतदारसंघातील टक्केवारीचा अंतिम आकडाही उशिरापर्यंत हाती आला नाही. मतदार यादीतील घोळ, मतदारांचा निरुत्साह, प्रचारास मिळालेला कमी कालावधी यामुळे मतदानाचा टक्का घसल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी- चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या मतदारसंघांत सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले. मावळ मतदारसंघात या वेळी मतदारांचा उत्साह कमालीचा होता. जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, दौंड, इंदापूर, शिरूर, भोर या मतदारसंघांत सकाळच्या सत्रात मतदार फारसे बाहेर पडले नाहीत; मात्र सकाळी दहानंतर सर्वत्र मतदारांचा उत्साह जाणवला. अनेक मतदान केंद्रांच्या आवारात चिखल आणि पाणी होते; पण त्याची तमा न बाळगता मतदानाचे कर्तव्य पार पाडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com