आग सुरूच; शहरात कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

डेपोतील कचऱ्याला लागलेली आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत प्रत्येक ठिकाणचा कचरा वर्गीकरण करून प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येत आहे. बहुतेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.
- ॲलिस पोरे, घनकचरा विभाग

पुणे - फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेली आग अजून आटोक्‍यात न आल्याने शहरातील कचरा रविवारीही (ता. १६) उचलण्यात आला नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागांतील कुंड्यांभोवती कचऱ्याचे ढीग साचले होते. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो आहे, तो उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने सांगितले. 

फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील कचरा डेपोला गेल्या तीन दिवसांपूर्वी आग लागल्याने तेथे कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात जमा होणारा कचरा उचलला जात नाही. सलग तीन-चार दिवसांपासून तो उचला नसल्याने अनेक भागांतील कचराकुंड्या भरून वाहत आहेत. त्यात आग, उन्हाच्या तीव्रतेमुळे आणखी चार दिवस तरी आग आटोक्‍यात येण्याची शक्‍यता नसल्याचे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.  मात्र, ज्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे, तो प्राधान्याने उचलण्याच्या हालचाली घनकचरा व व्यवस्थापन विभागाने सुरू केल्या आहेत. कुंड्यांमध्येच कचऱ्याचे वर्गीकरण करून, तो प्रक्रिया प्रकल्पांमध्ये पाठविला जात आहे. त्याकरिता जादा कंटेनरची सोय केली असून, पुरेशा कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर कुठे कचरा पडून राहणार नसल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ॲलिस पोरे यांनी सांगितले. 

कचरा प्रकल्प कार्यान्वित 
वडगाव (बु) आणि रामटेकडी येथील कचरा प्रकल्प शनिवारपासून कार्यान्वित करण्यात आले असून, या दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रत्येकी ५० आणि ६५ टन कचरा पाठविला आहे. हे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. बायोगॅसनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये कचरा नेला जात आहे. अजिंक्‍य प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे पोरे यांनी सांगितले. 

Web Title: pune city garbage issue

टॅग्स