पुणे शहराचा महापौर २६ नोव्हेंबरला ठरणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

पुण्याच्या नव्या महापौरांची निवड २६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. २०) अर्ज भरण्याची मुदत आहे. या पदाच्या निवडणुकीत महापालिकेत भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार असण्याची चिन्हे आहेत.

पुणे - पुण्याच्या नव्या महापौरांची निवड २६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. २०) अर्ज भरण्याची मुदत आहे. या पदाच्या निवडणुकीत महापालिकेत भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार असण्याची चिन्हे आहेत. 

विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांची मुदत येत्या २१ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असून, त्यानुसार २६ नोव्हेंबरला सकाळी अकराला निवडणूक होईल. त्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे बिनसले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात शिवसेना भाजपपासून लांब राहण्याच्या तयारीत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला साथ देणार नाही. तत्पूर्वी पक्ष श्रेष्ठींना कळविले असून, नेतृत्वाचा आदेश आल्यानंतरच भूमिका जाहीर केली जाईल, असे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले; तर शिवसेनेकडून कोणताही निरोप नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महापौरपदासाठी दोन्ही काँग्रेसकडून एकत्रित उमेदवार दिला जाईल आणि त्यासाठी शिवसेनेची मदत असेल, असे दोन्ही काँग्रेसकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune City Mayor Selection 26th november