टपाल खात्याचा 'सर्व्हर डाउन'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : सर्व्हर डाउन झाल्याने टपाल खात्याच्या सेवेवर शनिवारी परिणाम झाला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बचत प्रतिनिधी (एजंट) यांना त्रास सहन करावा लागला. 

पुणे : सर्व्हर डाउन झाल्याने टपाल खात्याच्या सेवेवर शनिवारी परिणाम झाला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बचत प्रतिनिधी (एजंट) यांना त्रास सहन करावा लागला. 

शहरात टपाल विभागाच्या पश्‍चिम विभागातील संगणकीय यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले गेले. 'कोअर सिस्टिम्स इंटिग्रेटेड' (सीएसआय) ही योजना राबविली जात आहे. हे काम सुरू झाल्यापासून पश्‍चिम विभागातील विविध पोस्ट ऑफिसमधील सेवेवर परिणाम होत आहे. ही यंत्रणा सुरळीत झाल्यानंतर पोस्ट ऑफिसमधील माहिती मुंबई येथील सर्व्हरकडे संकलित होईल. कर्मचाऱ्यांचे वेतन, रजा आदी कामे ऑनलाइन होतील, त्याचप्रमाणे टपाल, पार्सलचे 'ट्रॅक रेकॉर्ड' कळण्यास मदत होईल, असा दावा टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ही यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम झाले असून, अद्याप सेवा सुरळीत झाली नसल्याने अनेक पोस्ट ऑफिसमधील काही 'काउंटर'वर 'क्‍लोज' असे बोर्ड पाहावयास मिळत आहेत. 

सर्व्हर डाउन झाल्याने शहरातील कर्वे रस्ता, कोथरूड, शिवाजीनगर आदी भागांतील पोस्ट ऑफिसमधील कामावर परिणाम झाला आहे. या ठिकाणी रजिस्टर, रजिस्टर एडी करण्यासाठी आलेले नागरिक, त्याचप्रमाणे रोख भरणा करण्यासाठी आलेले खातेदार, विविध प्रकारच्या बचत योजनांचे काम करणाऱ्या बचत प्रतिनिधींना त्रास सहन करावा लागला. आर्थिक वर्षाची अखेर असल्याने गुंतवणूकदारांकडून पोस्टाच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्याचे प्रमाण वाढते. याच कालावधीत हे प्रकार घडत असल्याने त्यात गुंतवणूकदारांचा वेळ वाया जात आहे. 

इंटरनेट सेवा बंद पडल्यानंतर काही काळ सेवा विस्कळित होते, परंतु इंटरनेट सुरू झाल्यानंतर पुन्हा सेवा काम पूर्ववत होते, त्याचप्रमाणे यंत्रणा नुकतीच अद्ययावत केल्याने त्या माध्यमातून काम करताना तांत्रिक अडचणी येतात, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने अडचणी येत आहेत, असे टपाल विभागाच्या सूत्रांनी नमूद केले.

Web Title: Pune City Posts server faces frequent issues