#PuneRains आता पावसाची सटकली

bibwewadi-rain
bibwewadi-rain

पुणे - सप्टेंबरअखेरपर्यंत तरी पाऊस पुणेकरांची पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. २६) हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच, त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे शुक्रवारी (ता. २७) आणि शनिवारी (ता. २८) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

शहरात गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. हस्त नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर शहराच्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस पावसाची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. 
भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपन कश्‍यपी म्हणाले, ‘‘मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, रॉयलसीमा या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती आहे. त्याचवेळी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर चक्रवात आहे. यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत राहतील.’’
अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. राज्यातील बहुतांश भागांत बुधवारी दिवसभर हवामान ढगाळ होते, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

फळभाज्यांच्या खरेदीकडे ग्राहकांची पाठ
मार्केट यार्ड : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक ४० टक्‍क्‍यांनी घटली, अशी माहिती फळे व कांदा बटाटा विभागप्रमुख बाबा बिबवे यांनी दिली. दरम्यान, पावसामुळे शहरातील नागरिकांनी बुधवारी फळभाज्यांच्या खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मार्केट यार्डात गर्दी कमी होती. मार्केट यार्डातील बाजारात दररोज १२०० ते १८०० मालवाहने येतात; परंतु पावसामुळे बुधवारी केवळ ८१० वाहनांची आवक झाली. उठाव नसल्याने गाळ्यांवर शेतीमाल पडून होता. विभागप्रमुख बिबवे म्हणाले, की शुक्रवारी आणि रविवारी शेतमालाची आवक मोठी असते. कांदा-बटाटा विभागात २०१, तरकारी विभागात ४३८, फळविभागात १७० वाहनांतून शेतमाल विक्रीसाठी आला.दररोजपेक्षा ही ४०० वाहने कमी आली.

भूगाव, भुकूममध्ये  ४० तास ‘बत्ती गूल’
कोळवण : भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाल्याने मुळशी तालुक्‍यातील भूगाव व भुकूम गावामध्ये तब्बल ४० तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांतून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज नसल्याने परिसरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला होता. अनेक सोसायट्यांचे पाणी वर चढविण्यासाठी असणारे पंप बंद असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मोबाईललाही चार्जिंग नसल्याने अनेकांचे मोबाईल बंद होते. जोरदार पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. आज पावसाने मोठी उघडीप दिल्याने हा पुरवठा त्वरित सुरळीत केल्याचे महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड यांनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्याने छोट्या मुलांचे अधिक हाल झाले. रात्रभर डासांमुळे झोप दुरापास्त झाली.

शिंदेवाडीत वाहतूक ठप्प
खेड शिवापूर : शिंदेवाडी (ता. भोर) येथे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने येथील जकात नाक्‍याशेजारील संपूर्ण सेवारस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे शिंदेवाडीहून जुन्या बोगद्यामार्गे कात्रजला जाणारी वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद झाली होती. शिंदेवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने कात्रज नवीन बोगद्याकडील डोंगरावरून पावसाचे पाणी वाहत सेवारस्त्याने खाली आले. त्यामुळे जकात नाक्‍याशेजारील संपूर्ण सेवारस्ता पाण्याखाली गेला होता. या रस्त्यावर सुमारे दोन फूट पाण्याची पातळी होती. त्यामुळे या रस्त्याने जुन्या बोगद्यामार्गे कात्रजला जाणारी वाहतूक बंद झाली होती. गोगलवाडी फाट्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहनचालक मार्ग बदलून कात्रज नवीन बोगद्यामार्गे पुण्याला गेले. येथील उड्डाण पूल सुरू होतो, त्या ठिकाणच्या सखल भागातही पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर पाणी होते. पुणे-सातारा रस्त्यावरील जांभुळवाडी येथील दरी पुलावरही पाणी आले होते. पुणे-सातारा लेनच्या बाजूच्या डोंगरावरील पावसाचे पाणी उताराने वाहत दरीपुलावर गेले. त्यामुळे दरीपुलावरील उलट दिशेने येणाऱ्या पाण्यामुळे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती. कात्रज नवीन बोगद्याजवळ पुण्याकडील बाजूला दरडीचा काही भाग कोसळला. 


अशी उडाली दैना...
  आंबेगाव खुर्दमध्ये एका कंपनीच्या छतावर चार जण अडकले.
  पुणे वेधशाळेजवळ झाड कोसळले. दुचाकी व चारचाकी गाड्या दबल्या
  जांभूळवाडी नवीन बोगद्यातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक दरीपूल परिसरात थांबविली.
  आंबिल ओढ्याला पूर.
  कात्रज घाटात धबधब्यासारखे पाणी वाहू लागले.
  पीएमटीच्या मार्केट यार्ड डेपोची संरक्षक भिंत कोसळली.
  कात्रज येथील किमया सोसायटी परिसरातील वसाहतीत पाणी.
  वारजे परिसरात वनखात्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने 
मुख्य रस्ता जलमय.
  धनकवडी येथील सदगुरू पार्कच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये 
मोठ्या प्रमाणात पाणी.
  कोल्हेवाडीतील मधुबन सोसायटी, आंबेनशोरा सोसायटी आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाणी. दोन्ही सोसायट्यांचा पहिला मजला पाण्याखाली. काही रहिवासी अडकून पडले.
  आनंदनगरच्या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी; दुभाजक ओलांडून.
  आंबेगाव खुर्दमधील शनिनगरच्या धोकादायक उतारावर पावसाच्या पाण्याचा हाहाकार.
  संतनगरच्या सोसायटीत शिरले पाणी 
  धायरी आणि रायकर मळा यांना जोडणारा पादचारी पूल कोसळला
  सहकारनगरमध्ये संजीवन, गणेश सोसायट्यांमध्ये पाणी  
  ट्रेजर पार्क येथील पुलाचे लाकडी कठडे वाहून गेले
  लोअर इंदिरानगर येथे पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com