Two Wheeler : दुचाकीवर ट्रिपलसीट जाताय! तर मग हे वाचाच pune city rto two wheeler tripple seat traveling crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

people tripple seat ride

Two Wheeler : दुचाकीवर ट्रिपलसीट जाताय! तर मग हे वाचाच

पुणे - शहरात विविध ठिकाणी दुचाकीवर ट्रिपलसीट बसून भरधाव जाणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अशा बेशिस्त दुचाकीस्वारांचा वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या साडेतीन महिन्यांत सुमारे अडीच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे.

शहरात अनेक दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट बसून भरधाव दुचाकी चालविणे, नो एंट्रीमधून, विरुद्ध दिशेने आणि ओव्हरटेक करून जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

दुचाकीवर ट्रिपल सीट दिसल्यास वाहन परवानाही निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. तसेच, दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणे दुचाकीस्वारांना चांगलेच महागात पडणार आहे.

बेशिस्त दुचाकीस्वारांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. दुचाकीवर ट्रिपलसीट, मोबाईलवर बोलणे, मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ३१ मार्चपासून आत्तापर्यंत अशा ५७२ वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

वाहतूक पोलिसांनी केलेली दंडात्मक कारवाई

(२४ जानेवारी ते १० मे २०२३)

दुचाकीस्वार - २ हजार ४७७

दंडात्मक कारवाई - २४ लाख ५३ हजार ३५० रुपये.