पुणे शहराला आता सातही दिवस पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा झाल्याने संपूर्ण शहराला आता दररोज एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. वडगाव जलकेंद्राअंतर्गत आठवड्यातून एक दिवस झालेली पाणीकपातही थांबविली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा या आठवड्यात होईल.

पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा झाल्याने संपूर्ण शहराला आता दररोज एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. वडगाव जलकेंद्राअंतर्गत आठवड्यातून एक दिवस झालेली पाणीकपातही थांबविली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा या आठवड्यात होईल.

धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन सव्वा महिन्यापूर्वी शहराच्या वेगवेगळ्या भागांत पाणीकपात लागू करण्यात आली होती. विशेषतः महापालिकेच्या वडगाव जलकेंद्राअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या भागात आठवड्यातील एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे सिंहगड रस्त्यासह कात्रजपर्यंतच्या बहुतांश भागात पाणीकपात झाली. त्याचवेळी देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता; परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे सुमारे 50 टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांना पुढील नऊ महिने रोज एक वेळ पाणी मिळणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी होणाऱ्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढणार असल्याने पाणीकपातीचा निर्णय मागे घेऊन शहराच्या सर्व भागात रोज एक वेळ समान पाणी देण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे पुणेकरांना आता सातही दिवस पाणी मिळेल.

'या धरणांमध्ये 60 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर शहरातील सर्व भागांना नियमित पाणीपुरवठा केला जाईल. या संदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दहा दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल,'' असे महापालिका प्रशासनाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune City seven days water supply