
Pune: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा सचिव असल्याचे सांगत, निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाखांचा घातला गंडा
पुणे: महाविकास आघाडी सरकारमधील सहकारमंत्र्यांचा सचिव असल्याचे सांगून बड्या उद्योग समूहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. एका खासगी बँकेकडून दिलेले गृहकर्ज कमी करून देतो, असे सांगून फसवणूक केली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याबाबत एका निवृत्त अधिकाऱ्याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गगन रहांडगळे (रा. नागपूर), गोरख तनपुरे, विशाल पवार (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त झाले आहेत. त्यांनी २०१३ मध्ये तीन कोटी ६० लाखांना एका बंगल्याची खरेदी केली होती.
त्यासाठी त्यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. काही कारणांमुळे त्यांचे हप्ते थकले होते. त्यामुळे त्यांनी बंगल्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची जागा खरेदी विक्री करणारा दलाल गोरख तनपुरे याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा त्याने मेहुणा विशाल पवारच्या मार्फत बंगल्याची विक्री करून देतो.
त्यासाठी २५ लाख रुपये कमिशन द्यावे लागेल, असे सांगितले होते. गोरखने तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सचिव परिचयाचा असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर आरोपी गगनला ऑनलाइन दहा लाख रुपये पाठविले. गोरखने त्यांच्याकडून खर्चासाठी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा २५ लाख रुपये घेतले.
ंगगनने त्यांच्याकडे सहकारमंत्र्यांचा सचिवाची ओळख असल्याचे सांगितले. ते तुम्हाला बंगला परत मिळवून देतील, असे सांगून ३० लाख घेतले. मुंबईतील एका हॉटेलमध्ये त्यांच्याकडे २५ लाखांची मागणी केली. पण, त्यांना संशय आल्याने आरोपींना पैसे देण्यास नकार दिला.